वकिल महिलेचा विमानात विनयभंग; आरोपी अटक

वकिल महिलेचा विमानात विनयभंग; आरोपी अटक

आरोपी चंद्रहास त्रिपाठी

वकिल महिलेचा विमानातच विनयभंग केल्याप्रकरणी चंद्रहास त्रिपाठी याला मंगळवारी सहार पोलिसांनी अटक केली. चंद्रहास हा एका बड्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना बँकॉक, मुंबई दरम्यानच्या थाय एअरवेज विमानात घडली. विमानातील विनयभंगाची ही दुसरी घटना असून या घटनेची आता मुंबई पोलिसांनीही गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रवाशांबाबत लवकरच एक नियमावली बनविली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

29 वर्षांची ही महिला व्यवसायाने वकिल आहेत. काही दिवसांपूर्वी त्या कामानिमित्त बँकॉक येथे गेल्या होत्या. सोमवारी रात्री त्या बँकॉकहून मुंबईला येण्यासाठी थाय एअरवेज विमानाने निघाल्या होत्या. याच विमानात चंद्रहास त्यांच्यासोबत प्रवास करीत होता. चंद्रहास मुंबईहून मध्यप्रदेशला जाणार होता. सायंकाळी विमानाने उड्डाण केल्यानंतर या महिलेला कोणीतरी अश्लील स्पर्श करीत असल्याचे जाणवले. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र पुन्हा त्यांना तसा स्पर्श झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विमानातील कर्मचार्‍यांना ही माहिती सांगितली.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत या कर्मचार्‍यांनी त्यांना बसण्याची दुसरी जागा दिली होती. पहाटे ते विमान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच या महिलेने आरोपी चंद्रहासविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच चंद्रहास त्रिपाठी याला पोलिसांनी अटक केली. चंद्रहास हा एका बड्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी तो दिल्लीतील एका नामांकित कंपनीत कामाला होता. त्यानंतर तो सध्या भोपाळच्या कंपनीत रुजू झाला होता. गेल्या आठवड्यात अशीच एक घटना घडली होती. एका विमान कंपनीच्या कर्मचारी तरुणीशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी राजू गन्नप्पा या प्रवाशाला एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: October 24, 2018 5:59 AM
Exit mobile version