राज ठाकरे यांचे स्टँड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत; तावडेंनी लगावला टोला

राज ठाकरे यांचे स्टँड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत; तावडेंनी लगावला टोला

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टँड अप कॉमेडीचे शो सध्या सुरु आहेत. काल, १२ एप्रिल रोजी नांदेडला शो झाला. लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी सांगितले की, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वतः कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. पण आपल्या जाहीर सभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखवला गेला पाहिजे, याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी, अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज ठाकरे सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना संपविण्याची भाषा करत असल्याबद्दल त्यांच्यावर टीका करताना तावडे उपरोधिकपणे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही, उरले सुरलेले नगरेसवकसुध्दा पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वतःचा पक्ष संपला असताना दुसऱ्याला संपवण्याची भाषा हे कशी काय करतात, असा टोलाही त्यांनी मारला.

एका बाजूला नरेंद्र मोदी यांना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळत आहे. मोदी यांना नुकतेच संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च ‘झायेद मेडल’ हा नागरी पुरस्कार, दक्षिण कोरियाचा शांतता पुरस्कार, पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण पुरस्कार, अफगाणिस्तानचा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार, सौदी अरेबियाचा पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत. विविध देशांमध्ये मोदी यांना पुरस्कार देण्याची स्पर्धा सुरु आहेत आणि राज ठाकरे यांना मोदी हिटलर वाटत आहेत. पण जगामध्ये हिटलरचे असे कोणी स्वागत केले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या रिसोर्स टीम ने नीट माहिती काढावी व ती त्यांना दयावी. त्यामुळे मोदी यांच्या संदर्भात जे वास्तव जगाला कळाले ते राज ठाकरे यांनाही कळू शकेल असा टोलाही तावडे यांनी मारला.

First Published on: April 13, 2019 1:30 PM
Exit mobile version