महापालिका शाळांची रिसॉर्टची सहल अडचणीत

महापालिका शाळांची रिसॉर्टची सहल अडचणीत

मागील काही वर्षी ‘किडझेनिया’ला जाऊन मजा लुटणार्‍या महापालिका शाळांमधील मुलांना आता वॉटर पार्कमध्ये आनंद लुटण्याची संधी माहापलिका शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. याला महापालिका शिक्षण समिती आणि स्थायी समिती यांनी मंजुरी दिली. परंतु, पाण्याच्या ठिकाणी मुलांच्या सहली नेऊ नयेत, असे राज्य शिक्षण विभागाचे परिपत्रक असताना ही सहल नेण्याचा अट्टाहास शिवसेनेने धरला आहे. परंतु, गेल्याच आठवड्यात नालासोपारा येथील शाळेतील इयत्ता ९ वीमधील मुलाचा वॉटर पार्कच्या ठिकाणी आयोजित सहलीत मृत्यू झाल्याने महापालिकेच्या वतीने विरारच्या ‘ग्रेट एस्केप वॉटर पार्क’च्या ठिकाणी नेण्यात येणार्‍या सहलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपार्‍याच्या दुर्घटनेनंतर महापालिका शाळांची सहल रद्द करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी शालेय मुलांची सहल आयोजित करण्यात येते. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विरार पूर्व येथील ग्रेट एस्केप वॉटर पार्क येथे सहल नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे वॉटर पार्क १० एकर जागेवर असून यामध्ये विविध प्रकारच्या स्लाईड, पूल, ६ थ्रीलिंग स्लाईड, टोरेंट वेव पूल, जंगल थीम मल्टी वॉटर प्ले सिस्टीम तसेच मॅट रेसर, फनेल स्लाईड, डॅशिंग कार, तसेच गेम झोन आदी विविध प्रकारच्या खेळांचा त्यात समावेश आहे. इयत्ता चौथी व इयत्ता सातवी पर्यंतच्या सुमारे ७२ हजार शालेय मुलांना सहलीला नेले जाणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ५८५ रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार या सहलीसाठी महापालिकेच्या वतीने ४ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

याबाबत प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्यानंतर स्थायी समितीतही डिसेंबर महिन्यात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ही सहल जानेवारी महिन्यात नेणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही सहलीला सुरुवात झालेली नाही. मात्र, गेल्याच आठवड्यात नालासोपारा पूर्व येथील नवजीवन विद्यामंदिर शाळेच्या मुलांची सहल ठाण्यात सुरज वॉटर पार्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सहलीदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थ्याचा स्लाईडवर पडून अपघाती मृत्यू झाला. नालासोपार्‍यातील या घटनेनंतर मुंबई महापालिका शाळांमधील सहलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच सहलीला सुरुवात झालेली नाही. त्यात नालासोपार्‍यातील घटनेनंतर जर ही सहल नेल्यास आणि भविष्यात तशी दुर्घटना घडल्यास याला शिक्षण विभागाला जबाबदार धरले जाईल. विशेष म्हणजे स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर करताना सदस्यांनी याची जबाबदारी शिक्षण विभागाची राहील, असे सांगितले. त्यामुळे शिक्षण विभागापुढील अडचणी अधिकच वाढल्या असून, त्यामुळे सहल रद्द करावी की न्यायची या द्विधा स्थितीत शिक्षण विभाग अडकले असल्याचे समजते.

सहलीला अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र, ती रद्दही केलेली नाही. पुढील प्रक्रिया सुरू आहे.
– महेश पालकर, महापालिका शिक्षणाधिकारी

नालासोपारा येथील वॉटर पार्कमध्ये पिकनिकसाठी आलेल्या शाळकरी मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर, महापालिका शाळांमधील मुलांची सहल रद्द करण्याची मागणी केली आहे. नालासोपारा दुर्घटनेतून धडा घेऊन महापालिकेने ग्रेट एस्केप वॉटर पार्कच्या ठिकाणी सहल नेऊ नये. मात्र, त्यानंतरही सहल नेल्यास आणि तिथे काही दुर्घटना घडल्यास शिक्षण विभागाबरोबरच सत्ताधारी शिवसेना पक्षही जबाबदार राहील.
– रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका

First Published on: January 18, 2019 4:23 AM
Exit mobile version