‘आनंद दिघेंचा शिवसेनेलाच विसर; पुतण्या केदारकडेही दुर्लक्ष!’

‘आनंद दिघेंचा शिवसेनेलाच विसर; पुतण्या केदारकडेही दुर्लक्ष!’

हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून या..., मनसेचे शिवसेनेला आव्हान

एकीकडे राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांच्या सभेतल्या भाषणामुळे मुंबईतलं राजकारण फेर धरत असतानाच दुसरीकडे ठाण्यातलं राजकारण देखील आता ढवळून निघू लागलं आहे. शिवसेनेचे ठाण्यातले सर्वेसर्वा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाभोवती आता हे राजकारण पुन्हा फिरतंय की काय? अशी शंका वाटू लागली आहे. आनंद दिघेंच्या पुतण्याला अर्थात केदार दिघे यांना मनसे उमेदवारी देणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. तर राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि अभिजित पानसे ही जय-विरूची जोडी मनसेसाठी आगामी निवडणुकांमध्ये कमाल करणार का? यावरही खल होऊ लागले आहेत. मात्र, यामध्ये ठाणे बालेकिल्ला असलेली शिवसेना काय भूमिका घेते हेही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, ‘शिवसेना पैशांमुळेच ठाण्यात सत्तेत आहे, त्यांना तर आनंद दिघेंच्या समाधीचा देखील विसर पडला आहे’, अशा शब्दांत अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. mymahanagar.comच्या फेसबुक लाइव्हवर ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर बोचणारी टीका केली आहे.

‘माय महानगर’च्या ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातून विविध मान्यवरांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात येतं. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा बोलताना त्यांनी सर्वच प्रश्नांना ‘मनसे स्टाईल’ उत्तरं दिली. पण त्याचबरोबर ठाण्यात शिवसेनेला कडव्या शब्दांत टीका करून डिवचलं देखील आहे.

केदारला किमान सोबत तर न्या

केदार दिघेंच्या मुद्दयावर बोलताना शिवसेनेला आनंद दिघेंचा आणि त्यांच्या कामाचा विसर पडल्याचा आरोप यावेळी बोलताना अविनाश जाधव यांनी केला. आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघे यांना मनसेकडून आमदारकी किंवा खासदारकीची उमेदवारी दिली जाण्याच्या चर्चेला देखील त्यांनी उत्तर दिलं. ‘आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेना घडवली. तुम्ही किमान केदारला सोबत तर न्या. मला वाटलं, केदारवर अन्याय होतोय. म्हणून मी त्याला माझ्याकडे बोलवलं. त्याला नगरसेवक करायचं, आमदार-खासदार करायचं याचा निर्णय राज ठाकरे घेतील’, असं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं. तसेच, ‘दिघेंच्या वेळची शिवसेना वेगळी होती. आता फक्त सत्तेसाठी शिवसेना आहे, त्यांच्या नेत्यांना लोकांच्या प्रश्नांमध्ये रस नाही’, असं देखील ते म्हणाले.

पैशांमुळेच शिवसेना ठाण्यात सत्तेत

‘ठाण्यामध्ये शिवसेना फक्त त्यांनी ओतलेल्या पैशांमुळेच सत्तेत आहे. तसं करणं आम्हाला परवडणारं नव्हतं. निवडणुकांच्या काळात शिवसेनेने पैसा ओतला होता. पण आमच्याकडे राज ठाकरेंचे विचार आहेत. शिवसेनेलाही सत्ता मिळवायला २० वर्ष द्यावी लागली होती. आम्हाला थोडा वेळ लागणारच’, असं सांगत जाधव यांनी शिवसेनेवर यावेळी गंभीर आरोप केला. तसेच, ‘२०१४च्या निवडणुकांमध्ये ठाण्यात झालेल्या ७ लाख मतदानापैकी ७० ते ८० हजार मतं आम्हाला मिळाली. त्यामुळे १० टक्के ठाण्याची जनता आमच्यासोबत आहे’, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.

जितेंद्र आव्हाडांशी कोणतीही मैत्री नाही

मध्यंतरी दहीहंडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड अविनाश जाधवांच्या दहीहंडी महोत्सवामध्ये थेट स्टेजवर हजर झाले होते. त्यावरून ठाण्यात मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आव्हाड किंवा राष्ट्रवादीसोबत आपली कोणतीही मैत्री नाही, असं जाधव म्हणाले. ‘आव्हाडांची दहीहंडी बंद पडली. त्यांनी ठाण्यात दहीहंडी प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना दहीहंडीच्याच स्टेजवर बोलवणं मला योग्य वाटलं, म्हणून मी बोलावलं’, अशी भूमिका त्यांना मांडली. तसेच, ‘युतीचा निर्णय राज ठाकरेच घेतील, पण तोपर्यंत आमचा एकला चलो रे चाच नारा असेल’, असंही ते म्हणाले.

संजय निरुपममुळेच युपी-बिहारवाले मार खातात!

दरम्यान, उत्तर भारतीयांचा मुद्दा निघाल्यावर अविनाश जाधव यांनी अपेक्षेप्रमाणे संजय निरूपम यांच्यावर निशाणा साधला. ‘संजय निरुपममुळेच इथले यूपी-बिहारी मार खातात. तो काहीतरी बोलतो आणि हे मार खातात. त्याला सगळ्यात आधी गाशा गुंडाळून यूपी-बिहारला कायमचं पाठवून द्यायला पाहिजे’, अशा खोचक शब्दांमध्ये जाधव यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर टीका केली.

आमचं फक्त खळ्ळखट्याक् दिसतं

‘मनसे फक्त खळ्ळखट्याक् करत नसून अनेक समाजोपयोगी कामं देखील मनसे करते. मात्र, आम्ही केलेला गोंधळच समोर येतो. मी सुद्धा आता ठाण्याच्या आदिवासी भागातल्या ५०० आदिवासी मुलींची लग्न लावणार आहे. त्यांचं कन्यादान राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे करणार आहेत. पण ते कुणीही दाखवत नाही’, असं सांगत अविनाश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, ‘निवेदनावर काम होत नाही, म्हणून खळ्ळखट्याक् करावं लागतं. ते केलं म्हणून रेल्वेची परीक्षा मराठीत झाली, एअरटेलवर मराठी वाजायला लागलं’, असं ते म्हणाले.

मनसेतून नेते गेले, कार्यकर्ते नव्हे

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांवर त्यांनी यावेळी त्यांची भूमिका मांडली. ‘ज्यांना पक्षाने आमदार केलं, खासदार केलं, नेतेपद दिलं, अशीच मंडळी मनसे सोडून गेली. पण कार्यकर्ते सोडून गेले नाहीत. ते अजूनही मनसेसोबतच आहेत’, असं ते म्हणाले. तसेच, अनेक वर्ष कार्यकर्ते कार्यकर्तेच राहतात, असं का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मनसेची बाजू मांडली. ‘ज्यांची व्हिजन मोठी असते, त्यांना मोठी संधी मिळते. मलाही तशीच जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यामुळे मनसेमध्ये प्रत्येकाला संधी मिळते’, असं त्यांनी फेसबुक लाइव्हमध्ये सांगितलं.


हेही वाचा – ‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र खिशात’ – मनसेची पोस्टरबाजी

‘आम्हाला कळलंय, दिखावा करावा लागेल’

दरम्यान, राज ठाकरेंच्या सध्या बदलेल्या स्वरूपाविषयी देखील अविनाश जाधव यांना प्रश्न विचारण्यात आला. विदर्भ दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्यासोबत जेवणं असं करत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र, २०१४पूर्वीही राज ठाकरे हे सगळं करत होते असा दावा जाधव यांनी केला आहे. ‘राज ठाकरे आत्ता बदलले नाहीत. राज ठाकरे २०१४पूर्वीही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्यात जाऊन बसणं, जेवण करणं हे सगळं करत होते. पण तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्हतं. पण आता आम्हाला कळलंय की दिखावा करावा लागेल. कारण लोकांना दिखाव्याचीच भाषा कळते. फेसबुक-व्हॉट्सअपची भाषा कळते. की व्हॉट्सअपवर आलंय ते खरं आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांचं कॅम्पेन करतो’, असं जाधव यांनी सांगितलं.

तर तुकाराम मुंढेंना जावं लागलं नसतं!

नाशिक महानगर पालिकेमधून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या करण्यात आलेल्या बदलीविषयी देखील अविनाश जाधव यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘नाशिक महानगर पालिकेमध्ये जर अजूनही मनसेची सत्ता असती, तर आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली झाली नसती’, असं ते म्हणाले. ‘राज ठाकरेंनी महापालिकेत आमच्या नेत्यांना भ्रष्टाचार करू दिला नाही. त्यातून नाराज होऊन नाशिकमधले आमचे नेते पक्ष सोडून गेले’, असा दावा त्यांनी केला.

ठाण्यात शिवसेनेचं कडवं आव्हान पेलण्यासाठी मनसे जय्यत तयारी करत आहे. स्वत: आनंद दिघेंचंच नाव केदार दिघेंच्या रुपाने मनसेशी जोडून घेण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे. अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव ही ठाण्यातली राज ठाकरेंची जय-विरूची जोडी वसई-विरारमधल्या ‘ठाकूर’ला जरी जड पडली असली, तरी शिवसेनेसारख्या ‘दादा’ पक्षाला टक्कर देण्यासाठी मनसेची किती तयारी झाली आहे, हे मात्र २०१९मध्येच कळेल!


पाहा सपूर्ण मुलाखत:

First Published on: December 4, 2018 9:16 PM
Exit mobile version