घरमुंबईमनसेकडून आनंद दिघेंच्या पुतण्याला आमदारकीची ऑफर

मनसेकडून आनंद दिघेंच्या पुतण्याला आमदारकीची ऑफर

Subscribe

शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मनसेने थेट ऑफर दिल्याने ठाण्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मागील निवडणुकीत ठाणे शहरातील सेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपने खिंडार पाडल्याने हा घाव शिवसेनेच्या जिव्हारी लागला असतानाच, आता मनसेकडून दिघेंच्या पुतण्याला निवडणूक रिंगणात उतरविण्याची खेळी खेळली जात आहे. दरम्यान, केदार दिघे यांनी आगामी विधानसभा निवडणूक ठाणे शहर मतदारसंघातून लढविणार असल्याचे मत ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत केदार दिघे यांना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यास, ते मनसेचे उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसेच्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून शिवसेनेवर जहरी टीका केली. तसेच आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे मैत्रीचे संबंध होते असा धागा पकडत त्यांचे पुतणे केदार दिघे यांना मनसेत येण्याची ऑफर दिली. मनसेच्या व्यासपीठावरून दिघे यांना थेट ऑफर दिल्याने शिवसेनेतून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ठाण्यातील शिवसैनिकांचे प्रेरणास्थान असलेल्या आनंद दिघे यांचा ठाणे शहराबरोबर जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक असो शिवसेना ती आनंद दिघे यांच्या नावानेच लढवते. ठाणे शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जायचा. पण आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर हा बालेकिल्ला सांभाळण्यात स्थानिक नेतृत्वाला यश आले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्याला भाजपने खिंडार पाडत संजय केळकर हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपने हा गड खेचून घेतल्याने हा घाव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच मनसेने केदार दिघे यांना ऑफर दिल्याने शिवसेनेची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

- Advertisement -

ठाणे शहरातून दिघे हे इच्छुक आहेत. तसेच शिवसेनेत अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे दिघेंना उमेदवारी मिळणे अडचणीचे आहे. हीच संधी साधत मनसेने केदार दिघे यांना आपल्याकडे ओढण्याचे ठरवले आहे. केदार दिघे हे २०१० पासूनच शिवसेनेत सक्रीय आहेत. त्यांच्यावर युवा सेनेची ग्रामीण भागात निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती जबाबदारी चोखपणे पार पाडल्यानंतर त्यांनी इतर युवकांनाही संधी मिळावी या हेतूने तसेच ठाणे शहर भागात त्यांची काम करण्याची इच्छा दर्शवित २०१४ साली या पदाचा राजीनामा दिला. सध्या शिवसेनेने त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविलेली नाही. त्यामुळे दिघे नाराज आहेत. ठाणे शहरात शिवसेनेच्या आमदाराचा पराभव झाला. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला २१ जागा गमवाव्या लागल्या आहेत. ठाणे शहरात शिवसेनेची मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असतानाच, आता आनंद दिघेंच्या पुतण्याला मनसेकडून गळाला लावण्याची खेळी यशस्वी झाल्यास शिवसेनेला त्याचा जबर फटका बसणार आहे.

पार्श्वभूमी 

आनंद दिघे यांच्या काळात ठाणे शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जायचा. मात्र मागील निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढल्याने शिवेसनेच्या बालेकिल्ल्याला भाजपने खिंडार पाडले. या मतदारसंघात संघाची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच सेनेचा गड भाजपने हिरावून घेतला हेाता. यावेळी भाजपच्या संजय केळकर आणि सेनेचे रवींद्र फाटक यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी केळकर यांना ७०,८८४ तर रवींद्र फाटक यांना ५८,२९६ मते मिळाली होती. तब्बल १२ हजार मतांनी केळकर यांनी फाटकांचा पराभव केल्याने शिवसेनेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

- Advertisement -

मनसेच्या व्यासपीठावरून त्यांनी दिलेल्या ऑफरचे मी स्वागतच करतो. स्वत:च्या पक्षाच्या आंदोलनात जाहीरपणे बोलवणे याचे कौतुक केलेच पाहिजे. पण अजूनही या ऑफरबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. योग्य वेळी काय तो निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेने ग्रामीण भागाची जबाबदार दिली हेाती, ती चोखपणे बजावली. दिघे साहेबांनी भगवा फडकवलेल्या ठाणे शहरातून सेनेच्या आमदाराचा पराभव झाला. महापालिका निवडणुकीत २१ जागांवर पराभव झाला, त्यामुळे ठाणे शहरात काम करण्याची इच्छा मी शिवसेनेकडे व्यक्त केली होती. पण एक वर्ष झाले तरी अजून त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. दिघेसाहेबांनी कधी पद घेतले नाही. तसेच मला स्वत:हून घ्यावेसे वाटले नाही. स्वार्थाचे राजकारण करायचे असते तर १८ वर्षात कोणतेही पद पदरात पाडून घेतले असते. पण दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून तशा प्रकारचे कार्य करण्याची इच्छा आणि जिद्द आहे. त्यांचा पुतण्या म्हणून माझे काही कर्तव्य आहे. ठाणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठीच, त्यांच्या न्याय हक्कासाठीच, ठाणे शहरातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे.
-केदार दिघे, आनंद दिघे यांचे पुतणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -