येत्या काळात ‘त्यांचे’ काही एजंट तुम्हाला संपर्क करतील; उद्धव ठाकरेंचे माजी शिवसेनेच्या नगरसेवकांना आवाहन

येत्या काळात ‘त्यांचे’ काही एजंट तुम्हाला संपर्क करतील; उद्धव ठाकरेंचे माजी शिवसेनेच्या नगरसेवकांना आवाहन

मुंबई: मागील महिन्याभरापासून महाराष्ट्रातल्या राजकारणात(maharahstra politics) मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रचं या घडामोडींचा साक्षीदार आहे. ठाकरेंची सध्याची राजकीय स्थिती फार नाजूक आहे. अशातच महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना येत्या काळात ‘त्यांचे’ ( शिंदे गट) काही एजंट तुम्हाला संपर्क करतील. तुम्हाला आमिषं दाखवली जातील. तुम्हाला काही आश्वासने दिली जातील. पण तुम्ही कुणाचं ऐकू नका. तुम्ही तुमच्या वार्डात जाऊन फिरा लोकांची जास्तीत जास्त कामे करा. या निवडणुकीत गद्दारांना चांगलाच धडा शिकवा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या(shivsena corporators) माजी नगरसेवकांना केले आहे. यावेळी, शिवसेना खासदार अरविंद सावंत(arwind sawant), खा.अनिल देसाई, माजी मंत्री सुभाष देसाई(subhash desai), आ. अनिल परब, आ. रवींद्र वायकर माजी महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा –  भाजपला प्रादेशिक पक्ष आणि मित्र पक्ष संपवण्यातच अधिक रुची, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणे अपेक्षित आहे. राज्यातील सत्तांतर, त्यातच जुनी व नवीन पालिका निवडणूक प्रभाग रचना बदल यावरून शिंदे – भाजप(shinde – bjp) सरकार व शिवसेना यांच्यातील वादविवाद आणि आता शिवसेनेने प्रभाग रचना बदलाबाबतच्या निर्णयावरून न्यायालयात जाण्याची चालवलेली तयारी या वातावरणात शुक्रवारी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सेनाभवन’ येथे महत्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. निवडणुकीनिमित्ताने विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या आमिषाला बळी न पडण्याची खबरदारी घेण्याचा इशारा दिला. तसेच, प्रत्येक माजी नगरसेवकाने आपल्या प्रभागात विकासकामे करणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे आदी कामे करण्याचे आवाहनही केले.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी ‘ई’ विभागात एकाचवेळी ७ ठिकाणांहून निघाली प्रभातफेरी

ज्यांना जायचे तर जा ; मात्र गद्दारांना धडा शिकवा

जे गद्दारी करून सोडून गेले त्यांना जाऊ द्या. आणखीन कोणाला जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे. त्यांच्यावाचून आपले काही अडत नाही. मात्र गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर हीच ती वेळ आहे, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

निवडणुका लांबणीवर टाकण्याचा ‘ त्यांचा’ प्रयत्न

महापालिका निवडणुका कधी होतील ते नेमके सांगता येणार नाही. कारण की, ‘त्यांनी’ ( शिंदे गट) २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र आता निवडणुका झाल्या तर शिवसेनाच पुन्हा सत्तेवर येईल. त्यामुळेच ते निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप – शिंदे गटाच्या सरकारचे नाव न घेता केला.

हे ही वाचा – Aditya Thackeray : अयोध्येपूर्वी आदित्य ठाकरेंचा दिल्ली दौरा, राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता

विधानसभा व पालिका निवडणुका एकदम घेण्याची हिंमत दाखवावी

या सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई महापालिका व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही यद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना राज्य सरकारला दिले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. आता तुम्ही माजी नगरसेवक असलात तरी तुम्ही जनतेची कामे करीत राहा. तुमच्या कामगिरीवरच शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील व पालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकेल, असे उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘ पालिका आपली कामे करीत आहे. पण तुम्ही काम करत रहा’, असे आदेश माजी नगरसेवकांना दिले, अशी माहिती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच, हिंदू संस्कृती जोपासण्याचे काम शिवसेना करत आली आहे. सध्या मुंबईत ज्या पद्धतीने ‘स्वाईन फ्ल्यू’चे रुग्ण वाढत आहेत, त्याबाबत काळजी घ्या, असे सांगत मौलिक मार्गदर्शन केले, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

१३ माजी नगरसेवक गैरहजर

सेनाभवन येथे आयोजित महत्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे ( बंडखोर माजी नगरसेवक वगळून ) १३ माजी नगरसेवक गैरहजर होते. याबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता,
त्या १३ माजी नगरसेवकांपैकी काहींनी न येण्याचे कारणे सांगितली आहेत. तसेच, काही माजी नगरसेवक मुंबई बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले. या १३ नगरसेवकांमध्ये, माजी नगरसेविका व माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या पतीची प्रकृती ठीक नसल्याने त्या हजर राहू शकल्या नाहीत. तसेच, राजुल पटेल यांना रुग्णालयात जावे लागल्याने त्याही हजर राहू शकल्या नाहीत. त्याचप्रमाणे चित्रा सांगळे, अर्चना भालेराव, शुभदा गुडेकर यांची तब्येत ठीक नसल्याने त्या हजर राहू शकल्या नाहीत, असे विशाखा राऊत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आशिष चेंबूरकर, अमेय घोले हे सुद्धा काही कारणास्तव हजर राहू शकले नसल्याचे समजते.

हे ही वाचा – Aditya Thackeray on BJP : ज्यांना डोस द्यायचा त्यांना आम्ही देतो, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

शिंदे गटाच्या नगरसेवकांची ‘पाठ’

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात सामील झालेल्या यशवंत जाधव, वैशाली शेवाळे, शीतल म्हात्रे, आमदार व माजी नगरसेवक दिलीप लांडे, समाधान सरवणकर आदी माजी नगरसेवकांनी या बैठकीकडे ‘पाठ’ फिरवली.

First Published on: August 12, 2022 7:39 PM
Exit mobile version