…तर सफाई कामगार निवडणुकांवर टाकणार बहिष्कार; संघटनेचा इशारा

…तर सफाई कामगार निवडणुकांवर टाकणार बहिष्कार; संघटनेचा इशारा

मुंबई: मुंबई महापालिकेतील हजारो सफाई कामगारांना हक्काची घरे द्यावीत व इतर काही प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष व कामगार नेते गोविंद परमार यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास आझाद मैदान येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र या मोर्चानंतरही जर राज्य शासनाने दाद न दिल्यास कायदेशीर लढा व आक्रोश मोर्चा तीव्र करण्यात येईल. मानवाधिकार आयोगाकडे मदत मागण्यात येईल. प्रसंगी देशातील सर्व निवडणुकांवर जाहीर बहिष्कार टाकण्यात येईल, असा गंभीर इशारा कामगार नेते गोविंद परमार यांनी दिला आहे.

२३ मार्च रोजी होऊ घातलेल्या सफाई कामगारांच्या मोर्चाबाबत पत्रकारांना माहिती देताना परमार बोलत होते.
मुंबई महापालिकेत हजारो सफाई कामगार इमानेइतबारे काम करीत आहेत. संपूर्ण मुंबईतील घाण उचलण्याचे, शहर स्वच्छ ठेवण्याचे काम सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता करतात. त्यांना अपेक्षित व आवश्यक सेवासुविधा, पगारवाढ देण्यात येत नाही. त्यांच्या पिढ्यान पिढीच्या याच मुंबईत सफाई कामे करीत आहेत. लाड – पागे समितीचा अहवाल सादर झाला तेही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. सरकारी अधिकारी हे जाचक अटी शर्ती घालून सफाई कामगारांना देशोधडीला लावण्याची कटकारस्थाने करीत आहेत, अशा  शब्दांत गोविंद परमार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राज्यात सरकारे बदलत आहेत. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री , राजकीय पक्ष, नेते हे सफाई कामगारांचा वापर केवळ ‘ वोट बँकेसाठी करीत आहेत’, ‘ टोप्या घालण्याचे, लॉलीपॉप दाखविण्याची काम सरकारे, सरकारी बाबू करीत आहेत, असे गंभीर आरोप कामगार नेते गोविंद परमार यांनी यावेळी केले.

सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्या
सफाई कामगारांना हक्काची घरे द्यावीत, सफाई कामगारांना जाचक अटीशर्तीमधून वगळावे. सफाई कामातील कंत्राटी पद्धती रद्द करावी. सफाई कामगारांच्या समस्या व मागण्या मार्गी लावण्यासाठी महर्षी वाल्मिकी असंघटित सफाई कामगार बोर्ड बनविण्यात यावे. जात प्रमाणपत्राबाबतची अट शिथिल करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी पालिकेतील सफाई कामगार हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत.

First Published on: March 21, 2023 9:02 PM
Exit mobile version