CoronaVirus: मुंबईतील महापालिकेचे मार्केट पुन्हा गजबजणार

CoronaVirus: मुंबईतील महापालिकेचे मार्केट पुन्हा गजबजणार

प्रातिनिधीक फोटो

मुंबईत कोरेानाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या मंड्या अर्थात महापालिकेचे मार्केट पुन्हा एकदा गजबजणार आहेत. मुंबई महापालिकेने या मंड्यांमधील दुकाने समविषम तारखेस आळी पाळीने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देताना मंड्यांच्या असोशिएशनला कोरेानासंदर्भातील विशेष काळजी घेण्याच्या नियमांचे पालन करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. परंतु कोरोनामुळे जो भाग बाधित अर्थात कंटेन्मेंट झोन बनला असेल तेथील मंडई सुरु ठेवण्याचे अधिकार हे विभागीय सहायक आयुक्तांना देण्यात आलेले आहेत.

सम व विषम तारखेस दुकानं खुली करण्याचे निर्देश

मुंबईत बाजार विभागाच्‍या अखत्‍यारित ९२ किरकोळ मंडया, १६ खासगी मंडया व ९५ मंडया समायोजन आरक्षण अंतर्गत प्राप्‍त झाल्‍या आहेत. देशभरात कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २३ मार्च २०२० पासून टाळेबंदी अर्थात लॉक-डाऊन करण्यात आल्यानंतर मुंबईच्या मंडयांमधील अत्‍यावश्‍यक तसेच जीवनावश्यक वस्तू, सेवा देणाऱ्या दुकानांव्‍यतिरिक्त इतर दुकाने बंद करण्‍यात आली होती. परंतु मुंबईमध्‍ये दिनांक २ जून २०२० पासून रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूस असलेली दुकाने सम व विषम तारखेस खुली करण्‍यासाठी निर्देश देण्‍यात आले आहेत. या आदेशाच्‍या अनुषंगाने विविध मंडयांतील व्‍यापारी संघटना व त्‍यांच्‍या प्रतिनिधींनी मंडयांतील इतर दुकाने सुरु करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला लेखी विनंती केली.

सकारात्मक पाऊल उचलून मंडया सुरु करण्यास परवानगी

कोविड १९ संसर्ग वाढू नये यासाठी शासनाच्‍या अटी व शर्तींचे पालन करुन मंडईतील दुकाने सुरु करण्‍यास या संघटनांनी सहमती दर्शवली आहे. मास्क-हॅण्ड ग्लोव्हज्‌, सॅनिटायझर यांची व्यवस्था करणे, प्रत्येक व्यक्तिचे शारीरिक तापमान तपासणे, सुरक्षित अंतर राखणे या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासह आवश्यकता भासल्यास मंडईमध्ये गर्दी नियंत्रणात करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात खासगी सुरक्षा रक्षक नेमणे आदी उपाययोजना करुन प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल, असे या विविध संघटनांनी मान्य केले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनानेही सकारात्मक पाऊल उचलून मंडया सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

महानगरपालिकेच्‍या मंडयामधील काही दुकानांची रचना ही तळमजल्‍यावरील संकुलात्‍मक स्‍वरुपाची असून काही दुकाने समोरासमोर, तर बहुतांश मंडईत ३० ते ४० बंदीस्‍त दुकाने एकमेकांना लागून आहेत. मंडईमधील जीवनावश्‍यक वस्‍तुंची विक्री करण्‍याकरीता यापूर्वी नियमानुसार परवानगी होती. आता जीवनावश्‍यक वस्‍तुंव्‍यतिरिक्‍त इतर वस्‍तुंची विक्री करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मंडईमधील सर्व दुकाने रविवारी बंद राहतील. तसेच मंडयांमध्ये किरकोळ स्वरुपातीलच व्यवसाय करता येईल, घाऊक व्यवसाय करता येणार नाही. मंडई व परिसरामध्ये थुंकण्यास व अस्वच्छता करण्यास मनाई असून तसे करताना आढळलेल्या दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल. मात्र, मंडईमध्ये उपहारगृह (हॉटेल/कॅन्टीन) इत्यादी बंद राहतील. दुकानांमध्ये काम करण्यासाठी फक्त २ व्यक्ती असतील. तसेच कामे करण्यासाठी दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती यांना नेमता येणार नाही.


बॉडी बॅग खरेदीतील आरोप प्रकरणी कंपनीची पोलीस ठाण्यात धाव
First Published on: June 24, 2020 10:22 PM
Exit mobile version