सक्तीच्या भूसंपादनाला वेग ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प

सक्तीच्या भूसंपादनाला वेग ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प

ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प

मुंबई ते रायगड जिल्ह्यातील उरणला थेट जोडणार्‍या शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी सक्तीचे भूसंपादन करण्याची कार्यवाही जलद करण्यात आली आहे. सक्तीने भूसंपादन करण्याचे घोषणापत्र काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने काढल्यानंतर आता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पासाठी जमिन दिलेली नाही, अशा 61 प्रकल्पग्रस्तांना संबंधित भूसंपादन अधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे.त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाबाबत काही हरकती असल्यास 30 दिवसांच्या लेखी निवेदन सादर करण्याची मुदत दिली आहे. यानंतर जमिनीची मोजणी करुन जागा सक्तीने संपादित केली जाणार आहे.

2004 साली कागदावर उतरलेल्या या प्रकल्पाला 2018-19 मध्ये जोमाने सुरुवात झाली आहे. 22 किमीच्या सागरी मार्गातील 16.5 किमीचा पूल समुद्रात असेल, तर उर्वरित 5.5 किमीचा मार्ग जमिनीवर असेल. शिवडी-न्हावा शेवा सी लिंक प्रकल्पाची किंमत सुरुवातीला 4 हजार कोटी होती. त्यात वाढ झाली असून ती सन 2016 मध्ये 17 हजार 700 कोटी झाली. तर, सद्यस्थितीत हा खर्च 22 हजार कोटींच्या घरात गेला आहे. या मार्गासाठीची समुद्राखालील पायाभरणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईच्या शिवडी दिशेकडून समुद्रात जेट्टी बांधण्यात आली आहे. या जेट्टीवरून समुद्राच्या तळाचा धांडोळा घेण्यात आला आहे. काही दिवसांनी न्हावा शेवाच्या दिशेनेही हे काम सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी भूसंपादन ही प्रमुख अडचण आहे. प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडको तसेच जेएनपीटीकडून काही जमिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पात उरण पनवेल तालुक्यातील काहीनागरिकांची जागाही बाधित होत आहे. काही प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पासाठी आपली जागा निवाड्यानुसार दिली आहे. तर उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, पनवेल तालुक्यातील गव्हाण या गावातील 61 प्रकल्पबाधितांनी अद्यापपर्यंतआपली जागा प्रकल्पासाठी दिलेली नाही. तर मुंबई महानगर प्रादेशिक विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणार्‍या मुंबई
ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी सिडको महामंडळ भूसंपादन करीत आहे.

सक्तीने भूसंपादन करण्यात येणारे क्षेत्र

तालुका – गाव – प्रकल्पबाधित संख्या – क्षेत्र
उरण जासई 50 (5-49-14)
उरण चिर्ले 10 (0-45-44)
पनवेल गव्हाण 1 (0-14-67)

* 22 किमीचा मार्ग
* समुद्रातील पुलाची लांबी 15.5 किमी
* नवी मुंबई येथे जमिनीवरील पुलाची लांबी 5.5 किमी
* एकूण सहा मार्गिका
* मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जोडणी
* नवी मुंबई विमानतळाला जोडणी
* जवाहरलाल नेहरू पार्ट ट्रस्टला जोडणी
* रेवस बंदराला जोडणी
* मुंबई-पनवेल अंतर 15 किमी.ने कमी होईल
* 130 हेक्टरवर उभारणार प्रकल्प, 88 हेक्टर जागा सिडकोची, तर 27.2 हेक्टर
* मुंबई पोर्ट ट्रस्टची, उर्वरित जागा खासगी मालकीची
* प्रकल्पाची किंमत अनेकदा वाढली

First Published on: March 15, 2019 4:43 AM
Exit mobile version