मुखमंत्र्यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर केली चर्चा

मुखमंत्र्यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर केली चर्चा

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या हालचाली सुरु आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जाहीर केले जाणार आहे.

रविवारी म्हणजेच पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर केले होते. त्यामुळे अधिवेशन सुरु होण्याआधी म्हणजे रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊन नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर हे नवनिर्वाचित मंत्री मंडळ बैठकीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देण्यास भाजपमधील नेत्यांकडून विरोध केला जात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तरी देखील राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रिपद हे निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद हवे आहे. त्यासाठी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांची नावं पुढे येत आहेत. यासाठी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधन एकनाथ शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन करुन दाखवले. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊ नये यासाठी सुभाष देसाई, दिवाकर सावते आणि रामदास कदम यांनी विरोध केला आहे.

हेही वाचा – 

मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला; मंत्रिमंडळ विस्ताराच्या नव्या तारखेची चर्चा!

First Published on: June 15, 2019 8:49 AM
Exit mobile version