घरमुंबईमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला; मंत्रिमंडळ विस्ताराच्या नव्या तारखेची चर्चा!

मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला; मंत्रिमंडळ विस्ताराच्या नव्या तारखेची चर्चा!

Subscribe

राज्य मंत्रीमंडळ विस्तारासाठीचा १४ जूनचा मुहूर्त टळल्यानंतर आता रविवारी म्हणजेच अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. त्याच संदर्भात स्वत: मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

सध्या राज्यामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होणार कधी? या आधी अनेकदा मंत्रीमंडळ विस्तार आज होईल उद्या होईल अशी चर्चा रंगत होती. १४ जूनचा देखील मुहूर्त निघून गेला. मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवीन तारीख समोर येत आहे. येत्या रविवारी म्हणजेच अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता तरी खरंच मंत्रीमंडळ विस्तार होणार की हीसुद्धा निव्वळ चर्चाच ठरणार? असा प्रश्न देव पाण्यात ठेवून बसलेल्या अनेक आमदारांना पडला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच आता पुन्हा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन मंत्रिंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री शनिवारी केंद्रीय नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार असून या बैठकीनंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे समजत आहे. दरम्यान, रंगशारदा येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असे सांगत तारखेचा सस्पेन्स मात्र कायम ठेवला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार तरी कधी? असा सवाल अनेक आमदारांना पडला आहे.

- Advertisement -

उद्धव म्हणतात ‘मी पंचाग पाहिले नाही’

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी ‘मी अजून पंचांग पाहिलेले नाही’, अशी प्रतिक्रिया देत मंत्रीमंडळ विस्तारावर बोलणे टाळले. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराला शिवसेनेची अंतर्गत नाराजी आणि आयारामांना मंत्रीपद देण्याच्या चर्चेमुळे विलंब झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अमित शहा यांनी ‘राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद नको’ अशा सूचना दिल्याचे समजत आहे. त्यामुळे राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला राधाकृष्ण विखे पाटील अडसर ठरत आहेत का? असा सवालही विचारला जात आहे.

अनेकांचे देव पाण्यात!

१४ जूनला होणारा मंत्रीमंडळ विस्तार न झाल्यामुळे देव पाण्यात ठेवून बसलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र आता रविवारी विस्ताराची नवी शक्यता असल्यामुळे शेवटची आस असलेले संभाव्य मंत्री पुन्हा एकदा विस्ताराच्या आशेवर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -