आमदारांच्या अंगावर भाजपच्या नगरसेविका गेल्या धावून; महासभेत गदारोळ

आमदारांच्या अंगावर भाजपच्या नगरसेविका गेल्या धावून; महासभेत गदारोळ

अपशब्द वापरत भाजपची नगरसेविका सभागृहात बाटली घेऊन आमदार गीता जैन यांच्या अंगावर धावून गेल्या. तर राखीव जागेत बारच्या परवानगीसाठी आरक्षण बदल्याच्या विषयावर भाजपच्या नगरसेविका निला सोन्स आणि भाजपचेच नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यातच वादावादी झाली. त्यामुळे मंगळवारच्या मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत गदारोळ झाला होता. मलःनिस्सारण केंद्राबाबतच्या ठरावावर आमदार तथा नगरसेविका गीता जैन बोलत असताना भाजपच्या नगरसेविका हेतल परमार यांनी जैन यांच्याकडे पाहून ’खाली बस’ म्हणत इशारे सुरु केले. परमार अपशब्द वापरत बाटली घेऊन जैन यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. हा वाद मिटवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करावी लागली.

मिरारोड येथील आरक्षण क्रं. ३०५ मध्ये विकास आराखड्यात बगीच्यासाठी राखीव असलेल्या जागेत बार बनवण्यासाठी सत्ताधारी भाजपने आरक्षण बदलण्यासाठी महासभेत ठराव मंजूर केला होता. त्यावर ’ज’ अन्वये प्रस्ताव दाखल करत चर्चा करण्यासाठी सोन्स उठल्या असता त्यावरून महासभेत रणकंदान सुरू झाले. महापौरांच्या परवानगीने चर्चा होत असताना नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी मधेमधे बोलत वाद घालण्यास सुरुवात केली. सोन्स यांनी शेट्टी यांच्यावर थेट ब्लॅकमेलर, असा आरोप केला. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. महापौरांनी सोन्स यांना बोलू न देता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत येणार्‍या महासभेत प्रशासनाच्या विधी विभाग व आयुक्तांनी काय कारवाई केली, याची माहिती सभागृहात द्यावी, असे निर्देश देत याविषयावरील चर्चा थांबवली.

प्रभाग क्रमांक १८ मध्ये भर नागरी वस्तीत गार्डनसाठी आरक्षित असलेल्या जागेत उभारलेल्या एका जुन्या बांधकाम असलेल्या इमारतीत अनधिकृत बार रेस्टॉरंट पर्यायाने लेडीज बार सुरु करण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या भाजप नेत्यांनी घातला आहे. मंगळवारी झालेल्या महापालिका महासभेत हा विषय मंजुरीसाठी आला होता. या प्रभागाच्या स्थानिक भाजप नगरसेविका निला सोन्स यांनी बार सुरु करण्याच्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. तो विषय सोन्स यांनी महासभेतही लावून धरण्याचा प्रयत्न केला.

सत्ताधारी भाजपने लेडिज बार भरनागरी वस्तीत सुरु करण्याचे ठरवले आहे, हा प्रकार दुर्दैवी आहे. अशाप्रकारे या अत्यंत चुकीच्या, बेकायदा प्रस्तावाच्या विरोधात असून रस्त्यावर उतरून शिवसेना या निर्णयाला प्रखर विरोध करेल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनीही यापूर्वी महापालिका आयुक्तांना लेखी पत्राद्वारे दिलेला आहे. बार सुरु करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या भाजपचे नगरसेवक अरविंद शेट्टी यांचे अनेक बार, रेस्टॉरंट आहेत. त्यातील अनेक अनधिकृतही आहेत. गेल्या महिन्यातच त्यातील एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. अशी गैरकृत्य करायचा ठेका शेट्टीने घेतलेला आहे का? आणि त्याला सत्ताधारी भाजपचे स्थानिक नेतृत्व व गट पूर्णपणे साथ देत आहे, असे चित्र दिसत आहे. भाजपच्या काही नगरसेवकांचे बेकायदा रेस्टोरंट, बार, लेडीज बार, अनधिकृत केंद्रे शहरात आहेत, असा आरोप आमदार सरनाईक यांनी केला आहे.

शहरातील नागरी वस्तीमध्ये अनधिकृतपणे चालू असलेल्या लेडिज बार व लॉजिंग-बोर्डिंगमुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. हायवे पट्ट्यातील या अनधिकृत लेडिज बार व लॉजिंग-बोर्डिंगमुळे शहरामध्ये वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यातील प्रामुख्याने सर्व अनधिकृत व्यवसाय हे मिरा-भाईंदर महापालिकेच्या सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे याप्रकरणी आपण स्वत: जातीने लक्ष घालून वाढत चाललेले अनधिकृत लेडिज बार व लॉजिंग तसेच वेश्या व्यवसाय बंद करून बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवावे. प्रशासनाला यावर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

हेही वाचा – 

मोठी बातमी! मेधा सोमय्यांचा संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

First Published on: May 18, 2022 4:02 PM
Exit mobile version