सुरक्षा रक्षकांवरून महासभेत नगरसेवक आक्रमक

सुरक्षा रक्षकांवरून महासभेत नगरसेवक आक्रमक

सैनिक सिक्युरिटीच या सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक कमी करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २५० सुरक्षा रक्षक घेतल्याप्रकरणी बुधवारी पार पडलेल्या ऑनलाईन महासभेत नगरसेवक आक्रमक झाले होते. सुरक्षा रक्षकांची नेमणुक करताना आयुक्तांनी विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मीरा-भाईंदर महापालिकेचे रुग्णालय , करोना उपचार केंद्र अनेकदा सुरक्षा रक्षक असताना ही कर्मचाऱ्यांच्या सोबत नागरिकांनी वाद घातल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी सैनिक सिक्युरिटीचे या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्याची कपात करत त्याठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २५० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती १२ महिन्यासाठी करण्यात आली असून यासाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च येणार आहे.

कंत्राटी पद्धतीने कपात करण्यात आलेल्या मे. सैनिक सेक्युरिटी कंपनीच्या सुरक्षा रक्षकामध्ये अधिक तर स्थानिक तरुणांचा समावेश होता. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी मनपा आयुक्तांकडे कंत्राटी सुरक्षारक्षकांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी केली होती. बुधवारी महासभेत शासकीय संस्थेकडून सुरक्षारक्षक पुरवण्याचा विषय चर्चेला आला. यावेळी भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी स्थानिक तरुण बेरोजगार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महापालिकेने अकरा महिन्यांची गरज नसतानाही कंत्राट देण्यात आल्याचे सांगितले.

सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करतेवेळी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी महासभेला विश्वासात न घेता निर्णय घेतला असल्याचा आरोप माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी यावेळी केला. शासकीय संस्थेचे सुरक्षारक्षक का हवेत याची माहिती मनपा आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी ही काँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी केली. यामुळे काही वेळ ऑनलाईन महासभेत सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीवरून वादंग झाल्याचे पाहायला मिळाले.

यावर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी सैनिक सिक्युरिटीच्या सुरक्षारक्षकांबद्दल अनेकांच्या तक्रारी देखील होत्या. त्यामुळे शासकीय संस्थांकडून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ३०० पैकी ५० जागा ह्या स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी भरती प्रक्रिया देखील राबवण्यास संस्था तयार असल्याचे त्यांनी सांगीतले.

हेही वाचा – 

चुना लावलेल्या दगडांची तटबंदी; बांधकाम विभागाचा अजब कारभार

First Published on: June 24, 2021 2:49 PM
Exit mobile version