वाडा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण

वाडा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात ‘पंचायत समिती वाडा, प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन आणि ब्लू स्टार लिमिटेड’ यांच्या माध्यमातून २५ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी डिजिटल साक्षर टॅबच्या माध्यमातून शिकणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता डिजिटल साधनांच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाडा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १ ली ते १० वीचे विद्यार्थी पहिल्यांदाच डिजिटल साक्षर टॅबच्या माध्यमातून भाषा, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान हे विषय शिकणार आहेत. त्याद्वारे जिल्हापरिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होऊन त्यांची कौशल्ये वृद्धिंगत होण्यास मदत होईल. समाजातील प्रत्येक घटकासाठी तंत्रज्ञानाचे शिक्षण ‘हवे तेव्हा, हवे तसे आणि हवे तितके’ मिळण्यासाठी डिजिटल साक्षर हे एक पाऊल आहे. शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर बनवणे आणि पारंपारिक अध्ययनातील डिजिटल दरी कमी करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

शिक्षण जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो यावर आमचा विश्वास आहे आणि तसाच आमचा प्रयत्न पण आहे. कोविडचा एकंदर शिक्षण क्षेत्रावर जो काही परिणाम होत आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी डिजिटल साक्षर टॅब अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल.
– प्रेम यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन

वाडा तालुक्यातील घोणसई, देवघर, बिलोशी, गोऱ्हे आणि केळठण या ५ केंद्रातील प्रत्येकी ५ अशा एकूण २५ शाळांसाठी टॅबचे वितरण जिल्हा परिषद शाळा देवघर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम यादव, देवघर ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच रुचिता पाटील, देवघरचे केंद्रप्रमुख गुरुनाथ पष्टे, जामघर केंद्रप्रमुख गोविंद पाटील, शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –

आरक्षणाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी

First Published on: September 2, 2021 8:17 PM
Exit mobile version