बदली होऊनही मुख्य लेखा परिक्षकांचा मोह सुटेना; पाच महिने महापालिकेत ठाण मांडून

बदली होऊनही मुख्य लेखा परिक्षकांचा मोह सुटेना; पाच महिने महापालिकेत ठाण मांडून

मीरा-भाईंदर महानगरपालिका (सौजन्य-लोकसत्ता)

मिरा भाईंदर महापालिकेत १६ मे २०१८ रोजी दिग्विजय चव्हाण यांची मुख्य लेखापरिक्षक या पदावर बदली करण्यात आली होती. शासनाने ९ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांची बदली मंत्रालयात सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात केली आहे. असे असतानाही मागील पाच महिन्यापासून चव्हाण यांना मोह सुटत नसल्याने महापालिकेत ठाण मांडून बसलेले आहेत. मुख्य लेखा परीक्षक दिग्विजय चव्हाण यांच्या कार्यकाळात अनेक बिले ही अव्वाच्या सव्वा दराने काढण्यात आली आहेत. त्यावर सत्ताधारी भाजप नगरसेवकांसह अनेकांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कोविड काळात १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला होता. तसेच आपले काम नियमानुसार न-करता त्यावर कुठलाही आक्षेप न-नोंदवता ठेकेदारांची बिले अदा करून जनतेच्या कररूपी पैशाच्या अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

कोविड काळात एका अंबुलन्स मागे प्रति महिन्याला ७ लाख रुपये, असे दहा रुग्णवाहिकेचे ७० लाखांचे बिल दर महिन्याला महापालिकेने ठेकेदाराला दिले आहे. १० महिन्यात एकूण ७ कोटी इतका खर्च फक्त रुग्णवाहिकेवर करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी करून चौकशीची मागणी केली होती. त्यावर आजपर्यंत चौकशी न-करता महापालिकेने मुख्य लेखा परिक्षक चव्हाण यांना पाठीशी घालण्याचे काम केल्याचा आरोप केला जात आहे. कोरोना काळात अलगीकरण व विलगीकरण कक्षामधील नागरिकांसाठी खरेदी केलेल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू या छापील किमतींपेक्षा तीन ते चारपट जास्त दराने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्वच वस्तू या अवास्तव दराने खरेदी करून यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार सत्ताधारी भाजपचे नगरसेवक श्रीप्रकाश उर्फ मुन्ना सिंह यांनी केली होती.

अधिकाऱ्यांची बदली होऊनही बदली झालेल्या ठिकाणी रुजू होत नसेल तर त्याची माहिती घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव, वित्त विभाग

मे ते १७ जुलै २०२० पर्यंतच्या उपलब्ध देयक मंजुरीच्या कागदपत्रांनुसार महापालिकेने १ कोटी ५९ लाख २२ हजारांची खरेदी केली आहे. त्यानंतर देखील खरेदी झालेली असलेली तरी त्याची देयके उपलब्ध नसल्याचे सिंह यांनी सांगितले. गुडनाईट मच्छर लिक्विडची छापील किंमत ८९ रुपये असताना त्याची खरेदी तब्बल १७५ रुपये प्रति नग दराने करण्यात आलेली आहे. १५ रुपयाची टूथपेस्ट ६७ रुपयांना; ६० रुपयांची टाल्कम पावडर १६० रुपयांना; १० रुपयांचा आंघोळीचा साबण ३२ रुपयांना; ४६ रुपयांच्या केसाच्या तेलाची बाटली १०० रुपयांना; १४५ रुपयांचा बिसलेरी पाण्याचा बॉक्स २४० रुपयांना खरेदी केल्याचे उजेडात आणून नगरसेवक मुन्ना सिंह यांनी तक्रार केलेली आहे. अन्य साहित्य देखील जास्त दराने खरेदी करण्यात आलेले असून मोठ्या संख्येने साहित्य खरेदी केले असताना छापील किमतीपेक्षा अवास्तव दर कसे पालिकेने दिले?, याप्रकरणी सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केल्यानंतरही चव्हाण यांनी कुठलाच आक्षेप न नोंदवता बिले मंजूर केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सुनील भगत, विलास भोईर यांनी मुख्यमंत्री व वित्त विभागाकडे चव्हाण यांच्याविरोधात तक्रार करून त्यांची बदली झालेली असल्याने त्यांना सेवामुक्त करून नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केलेली आहे.

(इरबा कोनापुरे –  हे भाईंदरचे वार्ताहर आहेत)

हेही वाचा –

निवडणूकजीवी केंद्र सरकार देशातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात अपयशी, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

First Published on: January 4, 2022 3:54 PM
Exit mobile version