भाईंदरमध्ये लस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

भाईंदरमध्ये लस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

मीरा भाईंदर महापालिकेकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम राबवली जात असताना योग्य प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे शहरातील सर्वच आरोग्य केंद्रामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या गर्दीमुळे कोरना नियमांचे उल्लंघन होत आहे. नागरिकांची गर्दी झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यदता नाकारता येत नाही.

मीरा भाईंदर महापालिकेच्या अनेक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. महापालिकेत शासनाकडून केला जाणारा लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे लसीकरण करण्यास अडचण निर्माण होत आहे. महापालिकेने शहरात १९ ठिकाणी लसीकरण करण्यासाठी केंद्रे तयार केली आहेत. लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. राज्य शासनाने १३ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी लसीचा साठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे शहरातील दोन ठिकाणी लसीकरण केले जात होते.

१२ मे रोजी काही प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे अनेक केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी सर्वच लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असे नागरिक सांगत आहेत. भाईंदर पूर्वेला बंदरवाडी येथे एकच केंद्र असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. त्या परिसरात आणखी लसीकरण केंद्र वाढवण्यात यावे जेणेकरून तेथील गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल, यासाठी आयुक्त यांच्याकडे नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लवकरच नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल असे सांगितले आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवकांनी दिली.

 हेही वाचा –

खिडकी योजनेतून मुंबईतील ६५० गृह खरेदी दारांना निर्मला सीतारामण यांच्या हस्ते चाव्या हस्तांतरीत

First Published on: May 14, 2021 12:00 AM
Exit mobile version