मिरा भाईंदरमध्ये शाळा भरली; चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

मिरा भाईंदरमध्ये शाळा भरली; चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

तब्बल पाऊणे दोन वर्षानंतर मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रथमच शाळेत पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांचे महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्यांचे वाटप करण्यात आले. आफ्रिकन ओमायक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका पाहता कोविड संदर्भित शासन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग बुधवार, १५ डिसेंबर, २०२१ पासून सुरु करण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी शिक्षण विभागाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबर सकाळी १० वाजता महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी महापालिकेच्या माशाचा पाडा शाळा व काशीगाव येथील शाळा या ठिकाणी भेट दिली. यावेळी स्थानिक नगरसेवक सचिन म्हात्रे, नगरसेविका मीरा देवी, उपायुक्त स्वप्नील सावंत, शिक्षण अधिकारी कविता बोरकर व शिक्षण विभाग कर्मचारी उपस्थित होते.

सद्यस्थितीत कोरोना संख्येत घट झालेली असली तरी सर्व चिमुकल्यांनी कोरोना नियमांचे योग्यरीत्या पालन करण्यासाठी महापौर व आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मास्कचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर राखणे यासाठी शाळेतील शिक्षकांनी देखील लहान विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वर्गांची, शाळेची, शौचालयाची व शाळेच्या परिसराची स्वच्छता राखण्याची सूचना देण्यात आली.

इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्याकरता ४ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. मीरा भाईंदर महापालिका हद्दीत १ ते ७ वीच्या एकूण ३६५ शाळा आहेत. यात महापालिकेच्या एकूण छत्तीस शाळा तर खासगी विनाअनुदानित ३३, स्वअर्थसहाय्य २५२ व खाजगी अनुदानित ४१ शाळांचा समावेश आहे. महापालिकेच्या ३६ शाळांमध्ये इयत्ता ८ वीचे वर्ग असणाऱ्या आठ शाळा आहेत. त्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या असून इयत्ता आठवीचे वर्ग भरवण्यात आले आहेत. यात एकूण ४२४ मुले आहेत. सर्व शाळा सुरू करण्यापूर्वी सोडियम हायक्लोराईड्स फवारणी, परिसर स्वछता अशा सर्व गोष्टींची तयारी करण्यात आली होती.

हेही वाचा –

Karan Johar च्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणता मंत्री ? आशिष शेलारांचा सवाल

First Published on: December 16, 2021 2:09 PM
Exit mobile version