कपासे ते सफाळे मार्गावरील वाहतूक सुरूच राहणार

कपासे ते सफाळे मार्गावरील वाहतूक सुरूच राहणार

कपासे ते सफाळे मार्गावरील वाहतूक सुरूच

नव्या पूलाच्या निर्मितीनंतरच जुना पूल पाडण्यात येईल, अशी ग्वाही प्रांताधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे तूर्तास नवा पूल वाहतूकीला उपलब्ध होईपर्यंतच कपासे ते सफाळे मार्गावरील सध्यातरी सुरुच राहणार आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला नरमाईची भूमिका घेणे भाग पडले आहे. डेडिकेटेड फ्रँट कॉरिडॉरच्या माध्यमातून रेल्वेचा विशेष प्रकल्प राबवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व, पश्चिम भागातील गावांना जोडणाऱ्या कपासे ओव्हर ब्रिजवरील वाहतूक मंगळवार, २२ फेब्रुवारी २०२२ रोजी बंद केली जाणार होती. यासंदर्भात पालघर व बोईसर विधानसभा आमदार, माजी राज्यमंत्री व जिल्हा परिषद सदस्य, कपासे, माकूणसार ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी यांनी प्रांतअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त समिती गठीत केली होती. या समितीने सोमवारी कपासे ओव्हर ब्रिजवर प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेत येत्या २ आठवड्यात ब्रिजच्या बाजूने समांतर असा पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच नव्या ब्रिजच्या निर्मितीनंतरच जुना ब्रिज पाडला जाईल, तोवर या मार्गावरील वाहतूक सुरूच राहिल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने समितीचे अध्यक्ष तथा प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी सांगितले.

डेडिकेटेड फ्रँट कॉरिडॉर कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने वैतरणा ते सचिन रेल्वे स्टेशन या दरम्यान असलेल्या जेएनपीटी ते दादरी वेस्टर्न फ्राईट कॉरीडोरचे काम हाती घेतले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील कपासे ते सफाळे मार्गावरील ओव्हर ब्रिजची उंची वाढविणे आवश्यक असल्याने या मार्गावरील जुन्या ब्रिजवरील वाहतूक बंद केली जाणार होती. राज्य महामार्ग बंद करण्याआधी डीएफसीसीकडून पश्चिम पट्ट्यातील २५ ते ३० ग्रामपंचायतीना कळवणे गरजेचे असतानाही त्यांना विश्वासात घेतले नाही. तसेच कपासे येथील भू. क्र. १२०/१ मधील जागा संपादित करताना ग्रामसभेच्या ठरावानुसार नाहरकत दाखला देताना अटी व शर्तींचे पालन करण्याचे रेल्वे प्रशासनाला सूचीत करूनही त्यानी ग्रामपंचायतीची दिशाभूल केली. ओव्हर ब्रिजला समांतर रस्ता न देता रामबाग-माकणे भागातून वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग दिला. या पर्यायी मार्गामुळे सफाळे रेल्वे स्थानकाजवळील क्रॉसिंग गेट ४२ मधून पूर्व-पश्चिम जाणाऱ्या वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होणार होती.

प्रत्यक्षपणे पाहणी केली असता, ज्या पद्धतीने मुंबईत मेट्रोची कामे करत असताना पिलरच्या डाव्या व उजव्या बाजूने वाहतूक ही सुरूच राहते. तशा पद्धतीचा प्रयोग करण्याच्या सूचना रेल्वेला दिल्या आहेत. येत्या दोन आठवड्यात ओव्हर ब्रिजला समांतर असा सर्व्हिस रोड बनवण्यात येईल. तसेच नवीन ब्रिज झाल्यानंतरच जुना ब्रिज पाडण्यात येईल, तोवर त्यावरून वाहतूक सुरू राहील.
– धनाजी तोरस्कर, प्रांताधिकारी, पालघर

यासंदर्भात, २१ फेब्रुवारी २०२२ रोजी आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद सदस्या मनिषा निमकर, कपासे, माकूणसार ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या बैठकित जिल्हाधिकाऱ्यांनी पालघरचे महसूल उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व डीएफसीसी प्रकल्पाचे अधिकारी यांची संयुक्त समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ग्रामस्थांसोबत झालेल्या चर्चेचा व पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत अहवाल समितीकडून जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात येणार आहे.

रेल्वेकडून पर्यायी रस्ता दिला न गेल्याने लोकांची दिशाभूल केली गेली. सफाळे पश्चिम भागातील एडवण ते कपासे दरम्यानच्या गावात दूध, भाजीपाला व्यावसायिकांचे तसेच नोकरदारवर्ग व विद्यार्थी यांचे मोठे हाल होतील. यादृष्टीने जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक घेण्यात आली होती. तरी रेल्वेकडून लवकरात लवकर पर्यायी मार्ग द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल.
– मनीषा निमकर, जिल्हा परिषद सदस्य

यावेळी प्रांतअधिकारी धनाजी तोरस्कर, डीएफसीसी असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर बि. पी. सिंग, माजी राज्यमंत्री व जिल्हा परिषद सदस्या मनीषा निमकर, शिवसेना पालघर जिल्हा समनव्यक अनुप पाटील, विभाग प्रमुख संतोष घरत, उंबरपाडा-सफाळे माजी सरपंच अमोद जाधव, माजी उपसरपंच राजेश म्हात्रे, माकूणसार सरपंच अमोल मोहिते, कपासे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा –

मुंबई महापालिका सुधारणा विधेयक मंजूर; मुंबई, ठाण्याची निवडणूक लांबणीवर?

First Published on: March 7, 2022 7:54 PM
Exit mobile version