वीज बिल थकल्याने १७ गावांचा पाणीपुरवठा बंद; १७ लाख ७० हजार रुपयांची थकबाकी

वीज बिल थकल्याने १७ गावांचा पाणीपुरवठा बंद; १७ लाख ७० हजार रुपयांची थकबाकी

पालघर तालुक्यातील सफाळ्यासह १७ गावांमधील अनेक नळजोडणी धारकांना नियमित पाणीपुरवठा होत असतानाही पाणी देयके भरलेली नाहीत. त्यामुळे सफाळे करवाळे येथील होणाऱ्या पाणीपुरवठा विजेचे बिल १७ लाख ७० हजार थकबाकी भरु न शकल्यामुळे १७ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. थकबाकीदार ग्राहकामुळे प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून संताप व्यक्त केला जात आहे. सफाळेसह एकूण १७ गावे व अनेक पाडे असून २५ हजारहून कुटुंबे आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे चार हजारहून अधिक नळजोडण्या आहेत. परंतु येथील बहुसंख्य जोडणीधारक ग्रामपंचायतीला पाण्याची देयके भरत नसल्याने थकबाकी झाली आहे. त्याचप्रमाणे सतरा गावांच्या ग्रामपंचायतीमधील ठराविकच ग्रामपंचायती पाणीपट्टी देत आहेत. त्यामुळे विजेची थकबाकी वाढ होत आहे. यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाने ग्राहकांना सूचना व नोटीस दिल्या. मात्र तरीही थकबाकीदाराने पाणी देयके न भरल्याने सफाळे ग्रामपंचायत वीजबिल भरू शकली नाही. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे.

थकीत वीज बिल न भरल्याने पाणी योजना वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. थकीत रक्कम भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू करता येणार नाही, अशी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. सफाळे ग्रामपंचायतने वीज बिल भरून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सफाळे परिसरात दोन धरणे असुनही गेल्या दहा वर्षांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. मोरवणे धरणाखाली काही पाडे बसले आहेत. मात्र त्या नागरिकांना आतापासूनच पाणी मिळत नाही. नागरिकांना मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दोन धरण असूनही मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशी आहे योजना

या १७ गाव पाणी योजनेचा प्रारंभ २००९ मध्ये करण्यात आला होता. करवाळे धरणातून योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये उंबरपाडा-सफाळे, कर्दळ, माकणे, मांडे, विराथन बुद्रुक, जलसार, टेंभी खोडावे, मांजुर्लि, करवाले, नवघर, कांदळवन, वैती पाडा आदी गावांचा समावेश आहे. गठित केलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य, अन्य पदाधिकारी म्हणून पंचायत समिती सदस्य व सर्व सरपंच समाविष्ट आहेत.

हेही वाचा – 

BJP 12 mla suspension revoked : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन अखेर मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

First Published on: February 11, 2022 9:10 PM
Exit mobile version