पाईपलाईनसाठी पेण – खालापूर रस्ता खोदल्याने वाहनधारक ‘गॅसवर’

पाईपलाईनसाठी पेण – खालापूर रस्ता खोदल्याने वाहनधारक ‘गॅसवर’

तालुक्यात विकासाच्या नावावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात येत असल्याने रस्त्यांची आधीच वाट लागली आहे. त्यात खड्ड्यांमुळे अपघातात वाढत होत असतानाच सावरोली गावाच्या हद्दीत ‘एक्सप्रेस-वे’ एक्सिट समोरील खालापूर-पेण रस्ता महानगर गॅस कंपनीकडून पाईपलाईन टाकण्यासाठी मधोमध खोदण्यात आल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. तसेत हे काम करताना सुरक्षा नियमांना पायदळी तुडविले जात आहे. विकासाचा अर्थ नागरिकांचा जीव धोक्यात घालणे आहे का? असा सवाल वाहनधारकांकडून विचारला जात आहे.

मागील काही महिन्यांपासून खोपोली, खालापूरसह कर्जत तालुक्यात महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. यासाठी खालापूर तहसील कार्यालयापासून तर तालुक्यात जागोजागी रस्ते खोदून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे खोदण्यात आले असून रस्त्यांची दैनावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर ठेकेदार खड्ड्यांवर भूसभुसीत माती टाकून कामचलाऊ काम असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. डांबरी रस्ते खोदून त्यात माती टाकल्याने अवजड वाहने गेल्यावर ही माती खचून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. परिणामी या खड्ड्यात आदळून वाहनांचे अपघात होत आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांना समांतर खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. पण आता तर हद्दच झाली. खोपोली – पेण रस्त्यांवरच खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. चांगल्या स्थितीतील या रस्त्यांची अक्षरशः वाट लावण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.‘एक्सप्रेस-वे’ एक्सिट समोरील खालापूर – पेण रस्त्यांवर पाईपलाईन टाकताना सुरक्षा नियमांचे पालन न करता काम होत असताना तहसील प्रशासन नक्की तालुक्यात पाहते तरी काय? अपघात होवून जीवितहानी झाल्यावर तहसील प्रशासन लक्ष देणार का? घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोचविण्यासाठी महानगर गॅस कंपनी लिमिटेड काम करते आहे की, रस्त्यांवर खड्डे पाडून अपघाताची परिस्थिती निर्माण करण्यासाठी? असा संताप सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

First Published on: February 15, 2022 8:58 PM
Exit mobile version