स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुर्‍हाड; कंपनीविरोधात साखळी उपोषण

स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुर्‍हाड; कंपनीविरोधात साखळी उपोषण

उरण: तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सीडब्ल्युसी) कंपनीने येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ तसेच कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने हुकूमशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय सीडब्ल्युसी कंपनी प्रशासन विरोधात रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सीडब्लूसी लॉजिस्टीक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून कामगारांनी सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.
गेली १५ वर्षांपूर्वी हिंद टर्मिनल कंपनी काम करत असताना सीडब्ल्युसी कंपनीच्या नियमानुसार सर्व क्षेत्रफळ न वापरता हिंद टर्मिनल कंपनी कोट्यवधींच्या आकड्यात भरमसाठ भाडे देऊनही ५०२ कामगारांना भरघोस पगार देत होती आणि त्या पगारात कामगारांचे घर खर्च सुरळीत चालत होते. दरम्यान, कंपनीचा कामाचा व्याप मागच्या कालावधी पेक्षा सध्या कामाचा व्याप जास्त दुपटीच्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा कंपनीने कामगार आणि कामगारांच्या पगारात ६० टक्क्यांनी कपात केली असून कंपनी एक प्रकारे कामगारांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत असल्याचा अरोप केला जात आहे.
जो जुना पगार चालू होता तो पगार आम्हाला दर सहा-सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत जुन्या पगाराची बरोबरी करावी व जुन्या पद्धतीने कामगार बदली नियम चालू ठेवावा. तसेच उर्वरित राहिलेल्या स्थानिक कामगारांना काही कालावधीमध्ये समाविष्ट करून घेणे अशी कामगारांची मागणी आहे. कामगारांना जुना पगार ३२००० ते ४०,००० पर्यंत पगार होता. आता पोलारीस कंपनीने नव्याने कारभार करायला घेतल्याने १५ वर्षे जुने असलेल्या कामगारांना १२००० रुपये सध्या कंपनी प्रशासन पगार देणार आहे. परंतु कामगारांचे म्हणणे असे आहे की जुना पगार २ वर्षात पूर्ण करा. थोडे थोडे करून जुना पगार पूर्ण द्यावा. मात्र कंपनी प्रशासन हि कामगारांची मागणी मान्य करायला तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने शासनाच्या सर्वच विभागात कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार देखील केले. मात्र कामगारांच्या मागण्या मान्य होत नसल्याने शेवटी ५०२ कामगारांनी रायगड श्रमिक संघटना तसेच न्यू मेरिटाईम अ‍ॅण्ड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सीडब्लूसी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्याच दिवशी सर्व कामगार, कामगारांचे कुटुंब पोलारीस लॉजिस्टिक कंपनी, भेंडखळच्या गेट समोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर साखळी उपोषण हे सर्वपक्षीय असून या साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जेएनपीएचे माजी विश्वस्त तथा कामगार नेते भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सरपंच मंजिता मिलिंद पाटील आदींनी साखळी उपोषण स्थळी हजर राहून आपले मनोगत व्यक्त करून जाहीर पाठिंबा दिला. विविध राजकीय पक्षांनी या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे सदर साखळी उपोषण अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सीडब्ल्यूसी लॉजिस्टिक पार्क कंपनीमध्ये पोलारीस लॉजिस्टिक्स पार्क कंपनी भाडे करारावर चालवण्यासाठी आलेली आहे. सदर कंपनी व्यवस्थापना बरोबर कामगार व ग्रामपंचायत कमिटी सोबत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत, परंतु त्या सर्व बैठकीत कामगारांच्या बाजूने समाधानकारक चर्चा झालेली नाही.कामगारांना अजूनही योग्य न्याय मिळालेला नाही.
-किरण घरत, कामगार

First Published on: February 27, 2023 9:21 PM
Exit mobile version