महागाई विरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध

महागाई विरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध

गेल्या काही दिवसापासून दररोज केंद्र शासनाकडून दरवाढ होत आहे. गॅस व भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीविरोधात बुधवारी पनवेलमध्ये शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी या महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्र येऊन मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध केला.

या मोर्चाचे नेतृत्व पनवेल उरण महाविकास आघाडी व शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार बाळाराम पाटील तसेच सचिव सुदाम पाटील यांनी केले. या मोर्चात माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादीचे नेते जी.आर.पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांसह हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरातील नीलकंठ दर्शन जवळील मोकळ्या भूखंडापासून सकाळी मोर्चाची सुरूवात झाली. त्यानंतर एस टी स्टॅण्ड समोरून पनवेलमध्ये प्रवेश करून लाईन आळी – आदर्श नाक्यावरून डावीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथून उजवीकडून भाजीमार्केट रस्ता – टपाल नाका – महात्मा गांधी रोड कापड बाजार – जय भारत नाका – महानगरपालिका – प्रांत ऑफिस असा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी अनेकांनी सायकली आणून मोर्चात सहभाग घेतला होता. तर काहींनी बैलगाडीतून प्रवास करीत आता पेट्रोल डिझेल महागल्याने या गाड्या घरी ठेवून बैलगाडीशिवाय पर्याय नसल्याचे दाखवून दिले.

यावेळी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे. या सर्व समस्यांमधून सामान्य माणसाला त्वरित दिलासा देण्यासाठी व केंद्र सरकारचा जाहीर आणि तीव्र निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे पनवेल मध्ये भव्य व धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने केंद्र सरकारविरुद्ध प्रक्षोभ यावेळी दिसून आला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मोर्चामुळे सकाळपासूनच पनवेल शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

First Published on: April 13, 2022 8:20 PM
Exit mobile version