कर्जतमधील पुरानंतर अनेकांचे संसार उघड्यावर

कर्जतमधील पुरानंतर अनेकांचे संसार उघड्यावर

कर्जतमधील पुरानंतर अनेकांचे संसार उघड्यावर

दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील उल्हास नदीला पूर आला होता. हा पूर ओसरल्यानंतर कर्जत शहरासह नेरळ, बिरदोळे, शेलू आणि अन्य ठिकाणी अनेकांचे संसार उघड्यावर पडले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. तसेच पुराच्या पाण्यातून वाट काढत असलेल्या बाप-लेकीला आपले प्राण गमवावे लागले. उल्हाससह पेज, चिल्हार या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तालुका अक्षरशः जलमय झाला होता.कडाव-चांदई रस्ता पुरामुळे बंद झाला होता. रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बीड ग्रामपंचायत हद्दीमधील ८ गावांना जोडणाऱ्या या उल्हास नदीवरील मोहिली येथील पुलाच्या दोन्ही बाजूचे भाग वाहून गेले आहेत. परिणामी ८ गावांचा संपर्क तुटला आहे.

पुराचे पाणी अनेकांच्या घरांतून शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्जत बाजारपेठ, न्यायालय परिसर, इंदिरानगर, कोतवाल नगर मधील म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगरमधील सत्यम अपार्टमेंट, नीलेश अपार्टमेंट,चंदन अपार्टमेंट, मुद्रे येथील शिवम कॉम्लेक्स, नेमिनाथ रेसिडन्सी, सिद्धार्थ नगर ज्ञानदिप सोसायटी, नेरळ शहरातील राजेंद्रगुरूनगर, पाडा, रेल्वे गेट, कालेकार चाळ, मातोश्री नगर, गंगा नगर, धामोते आदी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरातील वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या. धान्य, फर्निचर आदी वस्तूंचे नुकसान झाले. शिवाय घराघरात गाळाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

अतिवृष्टीमुळे घडल्या अनेक दुर्दैवी घटना

उमरोली ग्रामपंचायत हद्दीत पाली वाडीशेजारी दरड कोसळली असल्याचे समजताच तात्काळ प्रांत वैशाली परदेशी-ठाकूर, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मुद्रे बुद्रुक येथे दरडीमुळे एका घराची भिंत कोसळली, तसेच भिसेगाव एसटी स्टँड येथे दरड कोसळली. दामत गावा जवळील सौशल्यागृह प्रकल्पासमोरील चाळीतील मुनियार कुटुंबाच्या घरात पाणी शिरले. चाळीच्या शेजारीच असलेल्या ओढ्याचे पाणी वाढल्याने परिसर जलमय झाला होता. पाणी आल्याने इब्राहिम मुनियार यांनी कुटुंसह तिथून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ५ मुले आणि पत्नीसह छातीभर पाण्यातून त्यांना मार्ग काढावा लागला. त्याचवेळी मुलीचा पाय घसरून ती पाण्याच्या प्रवाहात पडली. त्यामुळे तिला वाचवायला मुनियार यांनी पाण्यात उडी घेतली. त्यांनी मुलीला पकडले देखील, मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने ते आणि त्यांची मुलगी जोया (७) कुटुंबाच्या डोळ्यादेखत वाहून गेली असल्याची हृदयद्रावक घटना घडली.

माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे. अशात मुसळधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. मात्र एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर वारंवार दरडी कोसळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी पाली भुतवली धरण ओसंडून वाहू लागल्यामुळे धरणातले मासे प्रवाहासोबत बाहेर येऊ लागले. मात्र हे मासे पकडण्यासाठी चालेलला आटापिटा पाहून अनेकांच्या छातीत धस्स होत होते. तर राजेंद्रगुरूनगर येथील इमारतींमधील पार्क केलेल्या चारचाकी गाड्या संरक्षक भिंत फोडून साधारण १०० फुटांवर वाहत गेल्या होत्या. या गाड्या बाहेर काढताना मालकांची चांगलीच दमछाक झाली. येत्या तीन-चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांत परदेशी-ठाकूर यांनी केले आहे.


हेही वाचा- Satara Landslide: सातारा आंबेघर गावात ४ घरांवर दरड, १२ जणांचा मृत्यू

First Published on: July 23, 2021 8:57 PM
Exit mobile version