उरण येथील संशयास्पद मच्छीमार बोट दुरुस्तीसाठी करंज्यात, पोलीस तपासामध्ये आले समोर

उरण येथील संशयास्पद मच्छीमार बोट दुरुस्तीसाठी करंज्यात, पोलीस तपासामध्ये आले समोर

रायगड – उरण शहरानजीक असलेल्या करंजा गावाच्या समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद मच्छीमार बोट दुरुस्तीसाठी तिथे आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या बोटीचा शाफ्ट तुटल्याने ती दुरुस्तीसाठी करंजा येथे आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या बोटीवर दोन खलाशी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून बोटीची कागदपत्रे तपासली जात आहेत.

नाव आणि नंबर नसल्याने संशय –

उरण येथील करंजा समुद्रकिनारी पोलीसांनी एक संशयास्पद बोट ताब्यात घेतली असून पोलीस तपास करत आहेत. रविवारी (25 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास मत्स्य विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना उरणनजीकच्या समुद्रकिनारी मच्छीमारी बोट आढळली होती. या बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने संशय निर्माण झाला होता. रेवस बंदरातील सुरक्षारक्षकांनी पाठलाग करत ही बोट ताब्यात घेतली. यावेळी, मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोटीची चौकशी केली असता तिची कागदपत्रे न मिळाल्याने संशय निर्माण झाला. यामुळे, या घटनेची माहिती उरण पोलिसांना देण्यात आली. यानंतर बोटीची तपासणी करण्यात आली. यावरुन, ही बोट मुंबईतील गोवंडी येथील श्रवणकुमार कनोजियांच्या मालकीची असून ती बोट ससूनडॉक येथील नवनाथ वराळ यांना मासेमारीसाठी देण्यात आली होती.

दुरुस्तीसाठी ससूनडॉकमध्ये – 

साईसागर असे या बोटीचे नाव असून शाफ्ट तुटल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही बोट ससूनडॉक इथून करंजा येथे आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बोटीमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या बोटीमध्ये सुमारे 250 लिटर अतिरिक्त डिझेल आढळून आल्यामुळे अत्यावश्यक वस्तू विनिमय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: September 27, 2022 9:37 AM
Exit mobile version