पारंपारिक होळीला आधुनिकतेचा साज

पारंपारिक होळीला आधुनिकतेचा साज

अलिकडच्या काही वर्षांपासूनरायगड जिल्ह्यात होळीच्या सणाला आधुनिकतेचा साज मिळू लागल्याने आजकल एक वेगळाच माहोल तयार होत असतो. ग्रामीण भाग, खेडेगावांतून होळीचा उत्साह अभूतपर्व असतो. नाच गाण्याचा कार्यक्रम होत असल्याने डीजेचा वापर सर्रास केला जात असून, यामुळे पारंपारिक ढोल, ताशा, खालूबाजा यांना सुट्टी मिळाली आहे. जेथे डीजेचा वापर शक्य नसेल तेथे बेंजो पथक दिमतीला असते. होळीसाठी लेझर लाईटचाही वापर होऊ लागल्याने तरुणाईला नाचण्यात अधिकच मजा वाटते. मात्र असे होत असले तरी या सणातील परंपरा जपण्याचाही प्रयत्न होताना दिसतो.

खारेपाटासह अनेक ठिकाणी सावरीच्या झाडाची होळी जंगळातून आणली जाते. ही होळी आणण्यासाठी गावातील तरुण मंडळींसोबत ज्येष्ठ मंडळीसुद्धा उत्साहाने जंगलात जातात. त्या ठिकाणी वन भोजनाचाही कार्यक्रम आखला जातो. होळी आणण्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आवर्जून येतात. होळी गावात नाचत-गाजत, गुळाल उधळत आणली जाते. सजावट करून ती उभी केली जाते. परिसराची सजावट आणि रोषणाई केली जाते. होळीच्या दिवशी स्त्रिया पारंपारिक वेशभूषा करून होळीची पूजा करतात आणि रात्री 12 वाजता होळीचा होम रचून ती प्रज्वलित केली जाते.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे नियमांचे पालन करून पारंपारिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करणार आहोत.
– सुशील कोठेकर, अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ गडब-जांभेळा

यावेळी महिला होळीची पारंपारिक गाणी गातात. यावेळी होळीमध्ये नारळ टाकून त्याचा प्रसाद वाटला जातो. होळी सणात पारंपारिक वाद्य वाजवून नाच-गाण्याचा कार्यक्रम असायचे. परंतु आता त्याची जागा आधुनिक वाद्यांनी घेतली असून, डीजेच्या तालावर लेझर लाईटच्या झगमगटात नृत्याचा कार्यक्रम होतो. परंतु या वर्षी कोरोनाचे सावट आणि निर्बंध यामुळे होळी साजरी करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. होळीनंतर रंगपंचमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात फनी गेम, कबड्डी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सोंग काढणे यांचा त्यात समावेश असतो. होळीचा होम सतत पाच दिवस जळत ठेवण्यात येतो. आधुनिक युगातही परंपरा जपण्याचा प्रयत्न अनुभवी मंडळी करीत असतात.

हेही वाचा –

नाशिकमध्ये तूर्तास लॉकडाऊन टळले, भुजबळ उतरले रस्त्यावर

First Published on: March 26, 2021 6:57 PM
Exit mobile version