पाकिस्तानात इंग्लंडचा संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार

पाकिस्तानात इंग्लंडचा संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार

इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. मुल्तानच्या क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र, सामन्यापूर्वी पाकिस्तानमधील मुल्तान शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. पाकिस्तानात इंग्लंडचा संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलपासून एक किलोमीटरच्या अंतरावर गोळीबार झाला. या गोळीबारामुळे इंग्लंडच्या संघाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Firing In Multan Around 1km Away From England Team Hotel)

इंग्लंडचा संघ १७ वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. तीन कसोटी मालिकेतील रावळपिंडीमधील पाहिला कसोटी सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरु होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच गोळीबार घडला. या गोळीबारानंतर पाकिस्तानी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा संघ मुल्तानच्या मैदानावर सरावाला निघण्याच्या काही वेळआधीच गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंग्लंडच्या संघाला पाकिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांना पुरवली जाते, त्या दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. गोळीबार झाल्यानंतरही इंग्लंडच्या संघाने सरावला जाण्याचा निर्णय घेतल्याने नियोजित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर ७४ धावांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. दरम्यान, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात इंग्लंड मार्क वुडला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लियाम लिविंगस्टोनच्या जागी वुडला संघात संधी दिली जाणार असल्याचे समजते. लिविंगस्टोनच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

रावळपिंडी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. पण अखेरीस ओली रॉबिन्स आणि अँडरसनच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. हा सामना इंग्लंडच्या संघानं 74 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 342 धावांची गरज होती. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 268 धावांवर ढेपाळला. महत्वाचे म्हणजे, इंग्लंडच्या संघानं तब्बल 22 वर्षानंतर पाकिस्तानला त्यांच्या मायदेशात कसोटी सामन्यात नमवले.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात साऊद शकलीनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 159 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तर, इमाम उल हकनं 48 धावांचं योगदान दिलं. याशिवायस, सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि अजहर अलीनं क्रमश:48 आणि 40 धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघाला 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे.


हेही वाचा – 9 टी-20, 6 वनडे आणि 4 कसोटी; भारतीय संघाचे आगामी काळातील वेळापत्रक जाहीर

First Published on: December 9, 2022 9:51 AM
Exit mobile version