IND vs ENG : भारतीय संघाला कुलदीपला संधी द्यावीच लागेल; माजी फिरकीपटूचे मत 

IND vs ENG : भारतीय संघाला कुलदीपला संधी द्यावीच लागेल; माजी फिरकीपटूचे मत 

कुलदीप यादव

चेन्नई येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ चायनामन कुलदीप यादवला संधी देईल अशी अपेक्षा होती. मात्र, भारताने या कसोटीत रविचंद्रन अश्विन, शाहबाझ नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्याचा निर्णय घेतला. अश्विनने उत्कृष्ट गोलंदाजी करत ९ विकेट घेतल्या. नदीम आणि सुंदरने मात्र निराशा केली. नदीमला केवळ चार विकेट घेता आल्या, तर सुंदरची विकेटची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारताला कुलदीपला संधी द्यावीच लागेल, असे भारताचे महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांना वाटते. कुलदीपने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असून त्यात २४ विकेट घेतल्या आहेत.

लगेच वगळता कामा नये

आता भारताकडे कुलदीपला संधी देण्यावाचून पर्याय नाही. तसेच त्यांनी कुलदीपला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसे सामने दिले पाहिजेत. त्याला एका सामन्यात खेळवून नंतर वगळता कामा नये, असे प्रसन्ना यांनी सांगितले. कुलदीपने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असले तरी त्याला दोन वर्षांहूनही अधिक काळ कसोटी सामना खेळायला मिळालेला नाही.

कुलदीप भारतासाठी एक्स-फॅक्टर

भारतीय संघ कुलदीपला देत असलेली वागणूक भारताचे माजी फिरकीपटू मणिंदर सिंग यांनाही फारशी आवडलेली नाही. कुलदीपवर विश्वास नसल्यास त्याला संघात स्थान कशासाठी दिले जाते? त्याला संधी न मिळण्यामागचे कारण मला अजूनही कळलेले नाही. बहुधा तो नेट्समध्ये ज्याप्रकारे गोलंदाजी करत आहे, ते संघ व्यवस्थापनाला फारसे आवडत नाही. कुलदीप भारतासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकेल. जागतिक क्रिकेटमध्ये फारसे चायनामन फिरकीपटू नसल्याने त्यांच्याविरुद्ध फलंदाजी करणे अवघड असते, असे मणिंदर म्हणाले.


हेही वाचा – कुलदीपचं घोडं अडतंय कुठं?


 

First Published on: February 10, 2021 10:35 PM
Exit mobile version