पुन्हा एकदा होणार भारतीय संघाचे दोन गट

पुन्हा एकदा होणार भारतीय संघाचे दोन गट

इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या पर्वाची सांगता आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या आयपीएच्या यंदाच्या पर्वाच्या अखेरच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. सर्व खेळाडू आयपीएलच्या जेतेपदासाठी कसून सराव करत आहेत. मात्र या आयपीएलनंतर भारतीय संघ दोन महत्वाच्या मालिका खेळणार आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका याच्यासोबत अशा दोन महत्वाच्या मालिका खेळणार आहेत. या दोन्ही मालिका लागोपाठ म्हणजे जून, जुलैमध्ये होणार असल्याने दोन मोठ्या मालिकांसाठी बीसीसीआयनं खास योजना आखली आहे.

क्रिकट्रॅकरनं दिलेल्या वृत्तानुसार, चेतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समिती दोन वेगवेगळे संघ तयार करणार असल्याची माहिती मिळते. गेल्या वर्षी भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्याचवेळी भारताचा दुसरा संघ श्रीलंकेला गेला होता. या संघात तुलनेनं नवखे खेळाडू होते. आताही बीसीसीआय अशाच प्रकारे दोन संघ तयार करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ जूनमध्ये भारतात येईल. ९ ते १९ जून दरम्यान भारत आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामने खेळेल.

दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू याठिकाणी दक्षिण आफ्रिका विरुद्धचे सामने होणार आहेत. या मालिकेत अनेक नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समन्वय राखून संघ निवडला जाणार आहे. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या तिलक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

अनुनभवी खेळाडू असलेल्या संघाचं नेतृत्त्व शिखर धवनकडे दिलं जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या संघात काही अनुभवी खेळाडू असणार आहेत. हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार यांची नावं आघाडीवर आहेत. सूर्यकुमार यादवचा फिटनेस योग्य असल्यास त्याचाही विचार होईल. तर दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा यांची निवड पक्की मानली जात आहे.


हेही वाचा – कोलकाताच्या संघाला मोठा धक्का; अजिंक्य राहाणे दुखापतीमुळे आयपीएल बाहेर

First Published on: May 16, 2022 9:01 PM
Exit mobile version