भावा कडक; रक्ताने माखला तरी तो खेळत राहिला

भावा कडक; रक्ताने माखला तरी तो खेळत राहिला

रक्ताळलेल्या पायाने वॉट्सन लढत राहिला

आयपीएलच्या १२ व्या हंगामात चौथ्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सचे सेलिब्रेशन अद्याप सुरु आहे. चेन्नईने अवघ्या एक रनने हा सामना आणि आयपीएलचे चौथ्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान गमावला. तरी चेन्नईने जिगरबाज खेळ खेळला. चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणण्याचे काम केले होते ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने. मात्र आता शेन वॉटसनबद्दल हरभजन सिंहने केलेल्या एका खुलास्यामुळे शेन वॉटसनला सलामच करावासा वाटेल.

हरभजन सिंहने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात शेन वॉटसनच्या डाव्या पायाचा गुडघ्या जवळ लाल रंग पसरलेला दिसत आहे. १५० धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला शेन मध्येच दुखापतग्रस्त झाला होता. मात्र तरिही तो खेळत राहिला अंतिम ओव्हर पर्यंत. मात्र तरिही त्याला चेन्नईला विजयश्री प्राप्त करून देता आली नाही. हरभजनने सांगितल्याप्रमाणे सामना संपल्यानंतर शेन वॉट्सनच्या गुडघ्याला सहा टाके घालण्यात आले आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही याबद्दल ट्विट करत वॉट्सनला सलाम ठोकला आहे.

“तुम्हाला त्याच्या पायावरचे रक्त दिसतेय का? मॅच संपल्यानंतर त्याच्या गुडघ्याला सहा टाके घालण्यात आले. रन काढताना उडी मारल्यामुळे त्याला दुखापत झाली होती. तरिही तो विनातक्रार बॅटिंग करत राहिला.” असा संदेशही हरभजनने आपल्या इन्स्टा स्टोरीला दिला आहे. शेन वॉट्सनने अंतिम सामन्यात ५९ बॉलवर ८० धावा केल्या होत्या. सलामीला येऊन तो चेन्नईला शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन गेला होता. मात्र एका ओव्हरमध्ये ९ रन्स हव्या असताना तो मध्येच रनआऊट झाला. जोपर्यंत वॉट्सन पिचवर उभा होता, तोपर्यंत मुंबई हा सामना जिंकेल असे वाटत नव्हते.

हरभजन सिंहची इन्स्टाग्राम स्टोरी

चेन्नईसाठी शेन वॉट्सने ही कामगिरी काही पहिल्यांदा केलेली नाही. आयपीएलच्या ११ व्या हंगामात २०१८ साली देखील त्याने अंतिम सामन्यात अशीच धडाकेबाज खेळी केली होती. सनरायजर्स हैदराबादने तेव्हा चेन्नईला १७८ रन्सचे टार्गेट दिले होते. वॉट्सनने त्या मॅचमध्ये ५७ बॉलमध्ये ११७ धावा ठोकल्या होत्या. त्याच्यामुळेच चेन्नईला आयपीएलचे तिसरे जेतेपद मिळाले होते.

वाचा – रोहित सांगतो, म्हणून मी मलिंगाला शेवटची ओव्हर दिली

दरम्यान यावर्षीच्या रोमहर्षक अंतिम सामन्यानंतर हरभजनने सांगितले की, “क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा सामना पैसा वसूल होता. मात्र आमची निराशा झाली. मुंबईला १४९ रन्समध्ये रोखल्यानंतर आम्हाला वाटलं आम्ही जिंकू शकतो. सुरुवातही चांगली झाली. मात्र नंतर लगातार विकेट्स पडत राहिल्या. आम्हाला अजूनही समजत नाही की आम्ही कसे हरलो. पण मुंबईचा विजय झाला, हे सत्य स्विकारावे लागले.”

First Published on: May 14, 2019 9:29 AM
Exit mobile version