घरक्रीडाम्हणून मलिंगाला शेवटची ओव्हर दिली - रोहित शर्मा

म्हणून मलिंगाला शेवटची ओव्हर दिली – रोहित शर्मा

Subscribe

चेन्नई सुपर किंग्सवर मात करत मुंबई इंडियन्सने विक्रमी चौथ्यांदा आयपीएलच्या करंडकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला अखेरच्या चेंडूवर सामना जिंकण्यासाठी २ धावांची गरज होती. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणार्‍या लसिथ मलिंगाने शार्दूल ठाकूरला अप्रतिम स्लोवर बॉल यॉर्कर टाकत पायचीत केल्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला. मलिंगाने या सामन्यातील आपली पहिली ३ षटके चांगली टाकली नव्हती. त्याने टाकलेल्या १६व्या षटकात वॉटसन आणि ब्रावो यांनी २० धावा चोपून काढल्या होत्या. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने जेव्हा मलिंगाला अखेरचे षटक देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, मला हे सर्वात महत्त्वाचे षटक अनुभवी गोलंदाजाला द्यायचे होते आणि म्हणून मलिंगाला गोलंदाजी दिली, असे सामन्यानंतर रोहितने सांगितले.

एखादा निर्णय जेव्हा तुम्ही घेता आणि तुम्हाला यश मिळते, तेव्हा तो निर्णय योग्यच वाटतो. मात्र, तो निर्णय तुमच्या विरोधात जाण्याचाही धोका असतो. त्या महत्त्वाच्या क्षणाला, ते अखेरचे षटक मला अनुभवी गोलंदाजाला द्यायचे होते, जो त्या दबावाच्या परिस्थितीतून याआधीही गेला आहे. मलिंगाने लाखो वेळा अशा दबावाच्या वेळी गोलंदाजी केली आहे. त्यामुळे मी त्याला अखेरचे षटक देण्याचा निर्णय घेतला. तो आजही टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. जेव्हा अखेरच्या षटकात नऊ धावांची गरज असते, तेव्हा काहीही होऊ शकते. मात्र, मी अनुभवी खेळाडूवर भरोसा दाखवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा आम्हाला फायदा झाला, असे रोहित म्हणाला.

- Advertisement -

अखेरच्या चेंडूआधी रोहित आणि मलिंगा यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यावेळी मी आणि मलिंगाने मिळून शार्दूलला स्लोवर बॉल टाकण्याचा निर्णय घेतला, असे रोहितने सांगितले. आम्हाला फलंदाजाला बाद करायचे होते. मी शार्दूलला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तोही मुंबईचाच आहे. त्याला मोठे फटके मारायला आवडतात हे मला माहीत असल्यामुळे मी आणि मलिंगाला मिळून शार्दूलला स्लोवर बॉल टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो चेंडू योग्य ठिकाणी पडला नसता तर शार्दूल मोठा फटका मारेल हा धोका होताच, असे रोहितने स्पष्ट केले.

धोनी बाद झाला तेव्हा सामना जिंकल्यासारखे वाटले – जयवर्धने

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अवघ्या २ धावांवर ईशान किशनने धावचीत केले. तो बाद झाला, तेव्हा आम्ही सामना जिंकलो असेच वाटले, असे मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाला. धोनी जेव्हा बाद झाला, तेव्हा आम्ही सामना जिंकलो असेच वाटले. मात्र, त्यानंतरही वॉटसन चांगली फटकेबाजी करत राहिल्याने सामन्यात रंगत होती. रोहितचे कौतुक करायला हवे, त्याने दबाव असताना खूप चांगले निर्णय घेतले. किरॉन पोलार्ड आणि मलिंगा या अनुभवी खेळाडूंनीही या सामन्यात आपले महत्त्व दाखवून दिले. फलंदाजीत जेव्हा आमचा संघ अडचणीत सापडला होता, तेव्हा पोलार्डने अप्रतिम फलंदाजी केली, असे जयवर्धनेने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -