IPL 2022 : आयपीएलच्या मैदानात भिडले दोन उद्योगपती, जाणून घ्या कुठे होतेय युद्धाची तयारी?

IPL 2022 : आयपीएलच्या मैदानात भिडले दोन उद्योगपती, जाणून घ्या कुठे होतेय युद्धाची तयारी?

जगातील दोन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि जेफ बेझोस हे क्रिकेटच्या म्हणजेच आयपीएलच्या मैदानात आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही दिग्गज उद्योगपती पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलच्या मीडियातील हक्कांसाठी भिडणार आहेत. वास्तविक बीसीसीआयने या आठवड्यात आयपीएल सीझन २०२३ ते २०२७ साठी मीडिया हक्कांसाठी निविदा जारी केली आहे. २०२२ पर्यंत आयपीएलच्या मीडियाचा कारभार डिस्नी हॉटस्टारकडे आहे.

डिस्नी हॉटस्टार व्यतिरिक्त जेफ बेझोस यांची अॅमेझॉन कंपनी आणि मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ देखील पुढील पाच वर्षांसाठी मीडियाच्या हक्कांसाठी रिंगणात उतरणार आहेत. यासोबतच सोनी पिक्चर्स-जी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस आणि वॉल्ट डिस्नी यांच्यातही स्पर्धा होण्याची शक्यता ब्लूमबर्गद्वारे वर्तवली जात आहे.

सामन्यांचे टेलिव्हिजनवर प्रक्षेपण आणि ऑनलाईन स्ट्रीम करण्याचे अधिकार पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विकले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मीडियाच्या हक्कांसाठी ई-लिलावाला १२ जूनपासून सुरूवात होणार आहे. १२ जूनपासून सुरू होणाऱ्या या इव्हेंटमध्ये ७ अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक रकमेची बाजी लागण्याची शक्यता आहे.

सोनीला दहा वर्षे दिले होते अधिकार

आयपीएल सुरू झाल्यापासून २००८ ते २०१७ अशा पुढील दहा वर्षांसाठी सोनीच्या प्रसारणाचे अधिकार होते. आयपीएलचे सामने सेट मॅक्सवर प्रसारित केले जात होते. आयपीएलचे प्रसारण हक्क सोनीचे होते.२०१५-२०१७ मध्ये प्रथमच हॉटस्टारला डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामने प्रसारित करण्याचे अधिकार मिळाले होते.

जगभरातील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचे हक्क Amazon कडे आहेत. अॅमेझॉनकडे नॅशनल फुटबॉल लीग ऑनलाईन स्ट्रीम करण्याचे अधिकार आहेत. कंपनी त्यासाठी वर्षाला सुमारे १ अब्ज डॉलर्स भरत आहे.


हेही वाचा : Kirit Somaiya : तुरुंगात जाण्याचा पुढचा क्रमांक परिवहन मंत्र्यांचा, किरीट सोमय्यांची टीका


 

First Published on: April 1, 2022 10:30 PM
Exit mobile version