Swiss Open Badminton : सिंधू, श्रीकांतचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  

Swiss Open Badminton : सिंधू, श्रीकांतचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  

पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी स्विस ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच अजय जयरामने तिसऱ्या सीडेड रॅस्मस गेमकेला २१-१८, १७-२१, २१-१३ असा पराभवाचा धक्का दिला. महिला एकेरीत सिंधूने उत्कृष्ट खेळ केला. तिने अमेरिकेच्या इरिस वांगवर २१-१३, २१-१४ अशी सरळ गेममध्ये मात केली. श्रीकांतला मात्र स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने फ्रांसच्या थॉमस रुक्सेलला २१-१०, १४-२१, २१-१४ असे पराभूत केले. या सामन्याची श्रीकांतने चांगली सुरुवात करत पहिला गेम २१-१० असा मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याचा खेळ खालावला. तिसऱ्या गेममध्ये पुन्हा त्याने दमदार खेळ करत हा गेम २१-१४ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

गेमकेला पराभवाचा धक्का 

जागतिक क्रमवारीत ६० व्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या अजय जयरामने तिसऱ्या सीडेड डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेला २१-१८, १७-२१, २१-१३ असा पराभवाचा धक्का दिला. या सामन्याचा पहिला गेम जयरामने जिंकल्यानंतर गेमकेने चांगले पुनरागमन करत दुसरा गेम जिंकला. तसेच तिसरा गेम सुरुवातीला चुरशीचा झाला. या गेमच्या मध्यंतराला जयरामकडे ११-९ अशी केवळ दोन गुणांची आघाडी होती. यानंतर मात्र जयरामने सलग सहा गुण मिळवत गेममध्ये १७-९ अशी मोठी आघाडी मिळवली. त्याने पुढेही चांगला खेळ सुरु ठेवत हा गेम २१-१३ असा जिंकला.

First Published on: March 4, 2021 8:07 PM
Exit mobile version