भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी स्विस ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच अजय जयरामने तिसऱ्या सीडेड रॅस्मस गेमकेला २१-१८, १७-२१, २१-१३ असा पराभवाचा धक्का दिला. महिला एकेरीत सिंधूने उत्कृष्ट खेळ केला. तिने अमेरिकेच्या इरिस वांगवर २१-१३, २१-१४ अशी सरळ गेममध्ये मात केली. श्रीकांतला मात्र स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने फ्रांसच्या थॉमस रुक्सेलला २१-१०, १४-२१, २१-१४ असे पराभूत केले. या सामन्याची श्रीकांतने चांगली सुरुवात करत पहिला गेम २१-१० असा मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याचा खेळ खालावला. तिसऱ्या गेममध्ये पुन्हा त्याने दमदार खेळ करत हा गेम २१-१४ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
. @KSrikanth makes a strong come back to defeat French shuttler #ThomasRouxel 21-10, 14-21, 21-14 and secured a quarterfinal berth at the #YonexSwissOpen
Well played💪🏻 pic.twitter.com/hccIWwkLiC
— BAI Media (@BAI_Media) March 4, 2021
गेमकेला पराभवाचा धक्का
जागतिक क्रमवारीत ६० व्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या अजय जयरामने तिसऱ्या सीडेड डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेला २१-१८, १७-२१, २१-१३ असा पराभवाचा धक्का दिला. या सामन्याचा पहिला गेम जयरामने जिंकल्यानंतर गेमकेने चांगले पुनरागमन करत दुसरा गेम जिंकला. तसेच तिसरा गेम सुरुवातीला चुरशीचा झाला. या गेमच्या मध्यंतराला जयरामकडे ११-९ अशी केवळ दोन गुणांची आघाडी होती. यानंतर मात्र जयरामने सलग सहा गुण मिळवत गेममध्ये १७-९ अशी मोठी आघाडी मिळवली. त्याने पुढेही चांगला खेळ सुरु ठेवत हा गेम २१-१३ असा जिंकला.