पाकिस्तानच्या माजी खेळाडूने विराटला डिवचलं; भारतीय संघात दोन गट म्हणत म्हणाला…

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने विराटला डिवचलं; भारतीय संघात दोन गट म्हणत म्हणाला…

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-२० विश्वचषकानंतर टी-२० चे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. मंगळवारी बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेसाठी नवीन संघाची घोषणा केली त्यात विराटच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी तर सलामीवीर के.एल राहुलची उपकर्णधार पदी नियुक्ती केली आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने विराट कोहलीच्या टी-२० क्रिकेटमधील कर्णधारपदापासून दूर जाण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. भारतीय संघात दोन गट आहेत आणि त्यामुळेच विराट कोहली अस्वस्थ असल्याचा दावा त्याने केला.

मुश्ताकने पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, “जर एखादा यशस्वी कर्णधार सांगत असेल की, त्याला कर्णधारपद सोडायचे आहे. याचा अर्थ असा होतो की संघात आणि ड्रेसिंग रूममध्ये सगळे काही ठीक नसल्याचे संकेत आहेत. विराट अस्वस्थ आहे. आताच्या घडीला मला भारतीय संघात दोन गट असल्याचे दिसते आहे. यात एक गट मुंबईचा आणि दुसरा दिल्लीचा आहे”.

“आजच्या घडीला मला वाटते की विराट लवकरच आपल्या देशाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतून देखील संन्यास घेईल. तर इंडीयन प्रिमीयर लीगमध्ये त्याच्या संघाकडून खेळत राहिल. मला वाटते कोहलीने टी-२० साठी जे काही करता येईल ते केले आहे”. असे मुश्ताकने आणखी बोलताना सांगितले.

विराट कोहलीच्या नेतृत्वातील आयसीसी टी-२० ची ही शेवटची स्पर्धा होती मात्र संघाने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दोन सामन्यांत पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरूध्द भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. पहिल्या दोन्ही सामन्यांत झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठू शकला नाही.


हे ही वाचा :Padma Awards 2020: मूर्ती लहान पण कीर्ती महान; पद्म श्री पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती मंचावरून उतरले


 

First Published on: November 10, 2021 6:06 PM
Exit mobile version