WI vs PAK 2nd Test : शाहीन आफ्रिदीचा भेदक मारा; पाकला विजयाची संधी

WI vs PAK 2nd Test : शाहीन आफ्रिदीचा भेदक मारा; पाकला विजयाची संधी

शाहीन आफ्रिदीचा भेदक मारा

शाहीन आफ्रिदीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला विजयाची संधी आहे. या सामन्यात फवाद आलमच्या (नाबाद १२४) शतकामुळे पाकिस्तानने पहिला डाव ९ बाद ३०२ धावांवर घोषित केला होता. याचे उत्तर देताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १५० धावांतच आटोपला. डावखुरा वेगवान गोलंदाज आफ्रिदीने उत्कृष्ट मारा करताना ५१ धावांत ६ विकेट घेतल्या. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याला मोहम्मद अब्बासने तीन विकेट घेत उत्तम साथ दिली. पाकिस्तानने दुसरा डाव ६ बाद १७६ धावांवर घोषित करत विंडीजपुढे विजयासाठी ३२९ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर विंडीजची १ बाद ४९ अशी धावसंख्या होती.

विंडीजला २८० धावांची, पाकला ९ विकेटची गरज

या कसोटीत पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुळे एक संपूर्ण दिवस वाया गेला होता. मात्र, त्यानंतरही या कसोटीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. पाचव्या दिवशी चौथ्या डावात विंडीज विजयासाठी २८० धावांची, तर पाकिस्तानला ९ विकेटची आवश्यकता आहे. पहिल्या कसोटीत विंडीजने पाकिस्तानला केवळ एक विकेट राखून पराभूत केले होते. दुसऱ्या कसोटीत मात्र पाकिस्तानने आक्रमक शैलीत खेळ केला. चौथ्या दिवशी विंडीजने पहिल्या डावात ३ बाद ३९ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. शाहीनच्या भेदक माऱ्यामुळे विंडीजचा डाव १५० धावांत आटोपला.

पाकिस्तानचा आक्रमक शैलीत खेळ

पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी मिळाल्याने पाकिस्तानच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक शैलीत फलंदाजी केली. पाकिस्तानने २७.२ षटकांतच ६.४३ च्या रनरेटने १७६ धावा करत दुसरा डाव घोषित केला. त्यांच्याकडून सलामीवीर इम्रान बट (३७) आणि कर्णधार बाबर आझम (३३) यांनी चांगली फलंदाजी केली. विजयासाठी ३२९ धावांचा पाठलाग करताना विंडीजची चौथ्या दिवसअखेर १ बाद ४९ अशी धावसंख्या होती. कर्णधार क्रेग ब्रेथवेट (नाबाद १७) आणि नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेला अल्झारी जोसेफ (नाबाद ८) दिवसअखेर खेळपट्टीवर होते.


हेही वाचा – सरावाला सुरुवात, पण अफगाण क्रिकेटपटूंमध्ये भीतीचे वातावरण


 

First Published on: August 24, 2021 4:31 PM
Exit mobile version