पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मागायचा पैसे, विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर शिक्षक अटकेत!

पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मागायचा पैसे, विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर शिक्षक अटकेत!

प्रातिनिधीक फोटो

पास करण्यासाठी विद्यार्थाकडे दहा हजाराची मागणी करून न दिल्यास नापास करू अशी धमकी देऊन विद्यार्थ्यांचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डोंबिवलीतील एका महाविद्यालयातील शिक्षकाला बुधवारी मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षकाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. ओमकार भोईर असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

भोईर डोंबिवलीतील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षक असून त्याच महाविद्यालयात ११ वी कॉमर्स मध्ये शिकणारा तृषाल धुमाळ (१७) या विद्यार्थ्याने १४ फेब्रुवारी रोजी दिवा येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. तृषालचे कुटुंब गरीब असून वडील बिगारी काम करून कुटुंबाचा उदर निर्वाह करीत होते. तृषालच्या आत्महत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, मुलाच्या मृत्यूनंतर धुमाळ कुटुंब इतर कार्य करण्यासाठी कोकणात गावी गेले आणि लॉकडाऊन लागल्यानंतर ते गावीच अडकले.

दरम्यान, तृषालचा मोबाईल कुटुंबाने तपासला असता त्यात त्यांना तृषालने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली. त्यात त्याने ‘वर्ग शिक्षक ओमकार भोईर याने अकरावीत पास करण्यासाठी दहा हजारांची मागणी केली होती, पैसे दिले नाहीतर तुला नापास करू अशी धमकी दिली. मात्र घरची परिस्थती हालाखीची असल्यामुळे मी पैसे देऊ शकलो नाही. त्यानंतर सरांनी माझा सतत छळ सुरु केला आणि पैशांची मागणी करू लागल्यामुळे मी सरांना पैसे देऊ शकत नाही त्यामुळे मला सर नापास करतील म्हणून मी माझे जीवन संपवत आहे’ असे मोबाईल मध्ये लिहून ठेवले होते. तृषालने मोबाईलमध्ये लिहून ठेवलेली सुसाईड नोट वाचून कुटुंबाला धक्काच बसला. मात्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे धुमाळ कुटुंब दिव्यात येऊ शकले नाही. त्यानंतर कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे धुमाळ कुटुंबाचे घरचे नुकसान झाल्यामुळे ते येऊ शकले नाही.

मंगळवारी दिव्यात आलेल्या तृषालच्या कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तृषालने मोबाईलमध्ये लिहलेल्या सुसाईड नोटच्या आधारे वर्गशिक्षक ओमकार भोईर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी या तक्रारीवरून शिक्षक ओमकार भोईर याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बुधवारी त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. बुधवारी शिक्षक भोइरला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यालयीन कोठडी सुनावली आहे.

First Published on: December 16, 2020 7:02 PM
Exit mobile version