आता अजित पवारांना हवं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद?

आता अजित पवारांना हवं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद?

उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्या नावाभोवतीची चर्चा आणि तर्क-वितर्क अजूनही थांबण्याची चिन्ह नाहीत. एका रात्रीत महाविकासआघाडीला सोडून अजित पवार भाजपच्या गोटात दाखल झाले होते. एवढंच नाही, तर मध्यरात्रीतून सूत्र हलवत त्यांनी भल्या सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. मात्र, उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार न स्वीकारताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकासआघाडीच्या गोटात सामील झाले. पण आता पुन्हा एकदा अजित पवारांचं नाव पुढे आलं असून उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या चर्चेवरून राजकीय विश्वाचं लक्ष अजित पवारांकडे वळलं आहे. दरम्यान, अजित पवार आज शपथ घेणार नसून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अजित पवार का झाले नॉट रिचेबल?

आज सकाळपासून एकीकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू असतानाच दुसरीकडे अजित पवार ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये कुजबुज सुरू झाली होती. उद्धव ठाकरेंसोबत जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोन नेते शपथ घेणार हे निश्चित झालं होतं. त्यासोबतच जयंत पाटील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं देखील जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, ऐनवेळी अजित पवारांनी पुन्हा एकदा मेख ठोकली. जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद मिळत असल्यामुळे अजित पवार नाराज असल्याचं आधी सांगितलं गेलं. त्यामुळे स्वत: सुप्रिया सुळे यांनीच अजित पवारांशी फोनवर चर्चा केल्यानंतर ते त्यांच्या घरून ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले.


हेही वाचा – शपथविधीआधी ‘आदर्श’घोटाळ्याची फाईल उघडली; अशोक चव्हाणांना धक्का

अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद?

सिल्व्हर ओकवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असतानाच ‘अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर नसून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावरच अडून बसले आहेत’, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवारांची जोरदार चर्चा सुरू झाली. या बैठकीमधून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मागणीविषयी अजित पवारांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘त्याविषयी मला आत्ता काहीही बोलायचं नाही. बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतरच बोलेन’, असं अजित पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांच्यासोबत मी एकत्र शपथविधीला जाणार आहे असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता अजित पवारांच्या या उत्तरावरून नव्या चर्चेसा सुरुवात झाली आहे.

First Published on: November 28, 2019 2:56 PM
Exit mobile version