Corona Live Update: २४ तासांत देशात १५ हजार ९६८ नव्या रुग्णांची वाढ; ४६५ रुग्णांचा मृत्यू

Corona Live Update: २४ तासांत देशात १५ हजार ९६८ नव्या रुग्णांची वाढ; ४६५ रुग्णांचा मृत्यू

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत असून गेल्या २४ तासांत १५ हजार ९६८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखाच्या पुढे गेला आहे. तर ४६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ११४ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी मुंबईत ज्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८०० च्या घरात होती, ती संख्या आज बुधवारी वाढून १ हजारांहून अधिक झाली आहे. तर ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६९ हजार ६२५ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार ९६२ झाली आहे. तसेच आज २ हजार ४३४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३७ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)


आधार कार्ड पॅनशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.


राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

२९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर दि. १५ जून रोजी ५०७१ एवढे रुग्ण बरे होऊन एकाच घरी सोडण्यात आले. आज त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आज सोडण्यात आलेल्या ४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.


लॉकडाऊन झुगारून लग्न समारंभ

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना कर्फ्युचे सर्व नियम झुगारून मंगळवारी दुपारी एका सभागृहात लग्न समारंभ संपन्न झाला. जवळपास ७० ते ८० जण या लग्न समारंभात उपस्थित होते. या संदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजारच्या वर गेली आहे. अनेक क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे, अशी परिस्थिती असताना उल्हासनगर – १ या ठिकाणी हेमराज डेअरी जवळ असलेल्या पंचायत हॉल या ठिकाणी मंगळवारी दुपारी ३ .३० वाजण्याच्या सुमारास लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलीस नाईक बी.बी. आव्हाड आणि पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. या लग्न समारंभसाठी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी राजू पुरुषोत्तम नरसिंघानी, मोहनलाल पिरवानी (६७) आणि नासिर सलीम शेख (४२) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


मुंबई महापालिकेने महालक्ष्मी रेस कॉर्स याठिकाणी १ हजार खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे.


पुणे जिल्ह्यात रात्रीतून तब्बल १९२ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत एकट्या पुण्यात ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ हजार ४३वर पोहोचला आहे. तर १० हजार २८८ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वाचा 


ठाणे ग्रामीण मधील काशिमीर ट्रॅफिक ब्रँचचे सीनिअक पोलीस इन्स्पेक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सात दिवसांपासून अंधेरी सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. ट्रॅफिक ड्युटी करत असतानाच त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. सविस्तर वाचा


देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४६५ जणांचा बळी गेला आहे. तसेच सर्वाधिक १५ हजार ९६८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ५६ हजार १८३वर पोहोचला असून त्यापैकी १४ हजार ४७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २ लाख ५८ हजार ६८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १ लाख ८३ हजार २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सविस्तर वाचा 


औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आज औरंगाबादमध्ये १२५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २०६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मनपा क्षेत्रांतर्गत ८७ तर ग्रामीण भागातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ हजार ६१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 


लॅटिन अमेरिका आणि कॅरीबियनमध्ये १ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती एएफपी वृतसंस्थेने दिली आहे.


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ९३ लाख ५३ हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यापैकी ४ लाख ७९ हजार ८०५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० लाख ४१ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनामुळे २४८ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार २१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ९२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६९ हजार ६३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ % एवढे झाले आहे. सविस्तर वाचा

First Published on: June 24, 2020 11:22 AM
Exit mobile version