Corona Live Updates: पुण्यात एका दिवसात आढळले २०८ नवे कोरोना रुग्ण

Corona Live Updates: पुण्यात एका दिवसात आढळले २०८ नवे कोरोना रुग्ण

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यातील ५५ वर्षीय पोलीस हवालदार यांचा गुरुवारी करोनामुळे मृत्यू झाला आहे. ९ मे पासून ते करोनाशी लढा देत होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई पोलीस दलातील मृतांची संख्या ११ झाली असून राज्यातील संख्या १६ झाली आहे.

भिवंडीत कोरोनाचे आठ नवे रुग्ण आढळले

भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गुरुवारी शहरात पाच तर ग्रामीण भागात तीन असे एकूण आठ रुग्ण वाढले आहेत. या नव्या ८ रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२९ वर पोहचला आहे. 
शहरातील पाच नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी कामतघर येथील ३४ वर्षीय महिलेसह एक वर्षाची मुलगी अशा दोघी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना बाधित झाल्या आहेत. तर अजय नगर येथील ५७ वर्षीय महिला ही कळवा हॉस्पिटल येथे चार दिवस उपचार घेत असताना पॉझिटिव आढळली. तर कणेरी येथील ३३ वर्षीय डॉक्टर हे शहापूर येथे गरोदर पॉझिटिव्ह महिलेला सिझेरियन सेक्शन करताना अनेस्थेशिया देण्यासाठी गेले होते. तर त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर पाचवा रुग्ण पद्मानगर परिसरातील २८ वर्षीय महिला ही कळवा हॉस्पिटल येथे ते डिलिव्हरीसाठी गेली होती तीचे कोरोना रिपोर्ट देखील पोझिटिव्ह आले आहेत. या पाच नव्या रुग्णांमुळे शहरातील रुग्णांची संख्या ७१ झाली असून २६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला असून सध्या ४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यात एका दिवसात आढळले २०८ नवे कोरोना रुग्ण

चिंतेची बाब म्हणजे आज पुण्यात दिवसभरात २०८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. यामुळे ४ हजार १०७ एवढी रुग्णसंख्या झाली आहे असून आज अखेर २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात २३४५ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६४ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज २ हजाराहून जास्त नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. आजही तीच परिस्थिती राज्यात दिसून आली असून गेल्या २४ तासांत राज्यात २३४५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४१ हजार ६४२ झाला आहे. याशिवाय, गेल्या २४ तासांत राज्यात ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता १४५४ पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात १४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ११ हजार ७२६ झाला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईमध्ये कोरोनाचे १३८२ नवे रुग्ण, आज ४२ मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली असताना मुंबईत देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १३८२ने वाढून २५ हजार ३१७वर जाऊन पोहोचली आहे. शिवाय, आज दिवसभरात कोरोनाच्या ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मुंबईतला आकडा आता ८८२वर गेला आहे. आज दिवसभरात २८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून मुंबईत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ७५१ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या ४१ रुग्णांपैकी २३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये २४ पुरूष आणि १७ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ३ रुग्ण ४० वर्षांच्या खालचे, २१ रुग्ण ६० वर्षांच्या वरचे आणि १७ रुग्ण ४० ते ६० वर्षे वयोगटातले होते. (सविस्तर वाचा)


भारतात २४ तासांत ५ हजार ६०९ नवे कोरोना रुग्ण; १३२ जणांचा मृत्यू

जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तर मागील २४ तासांत देशात तब्बल ५ हजार ६०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


लक्षणं नसलेले रुग्ण कोरोना संसर्ग पसरवू शकत नाही – आरोग्य मंत्रालय

कोरोना व्हायरसबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत किंवा ज्यांना ताप नाही ते रूग्ण संक्रमण पसरू शकत नाही. अशा रुग्णांना सलग ३ दिवस ताप नसल्यास त्यांना १० दिवसानंतर डिस्चार्ज देता येईल. तसेच त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्याचीही आवश्यकता नाही. मात्र अशा रूग्णांना डिस्चार्जनंतर ७ दिवस घरी आयसोलेट व्हावे लागेल. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात ६९% कोरोना रुग्ण बिनालक्षणं असणारे आढळलेले आहेत. (सविस्तर वाचा)


पुण्यात यंदा साधेपणाने होणार सार्वजानिक गणेशोत्सव

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संकटाचा परिणाम धार्मिक सण-उत्सवांवरही होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव मंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडणे, सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणे, यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मंडळांच्या बैठकीत याबाबत एकमत झाल्यानंतर हा निर्णय समोर आला आहे. दरम्यान बाप्पाच्य मिरवणुकीबाबात अद्याप काहीही सुचना दिलेल्या नाहीत. त्या वेळेच्या परिस्थितीनुसार यावर निर्णय होईल, असे सांगण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल सर्व मंडळांचे पुणेकरांच्यावतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले. (सविस्तर वाचा)


मुंबईत आज आणखीन दोना पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामधले एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर दुसरे पार्कसाईट पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल होते.


आज राज्यातील जळगाव जिल्ह्यात ५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३५१वर पोहोचली आहे. तर अमरावतीमध्ये ५ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्ह्यात १३९ कोरोनाबाधित संख्या झाली आहे. तसंच चंद्रपुरात कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या १२वर झाली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात आज ५४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार १७३वर पोहोचला आहे.


गेल्या २४ तासांत १ लाख ३ हजार ५३२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत २६ लाख १५ हजार ९२० नमुन्यांची करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे.


गेल्या २४ तासांत देशात १३२ जणांचा मृत्यू झाला असून ५ हजार ६०९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १२ हजार ३५९वर पोहोचला आहे. यापैकी ६३ हजार ६२४ अॅक्टिव्ह रुग्ण असून ३ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


जगातील सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग झालेल्या अमेरिकेत कोरोनाच्या बळींची संख्या कमी होत नाहीये. कालही अमेरिकेत १,५६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीही १५०० रुग्णांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून दिवसाला किमान हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे.

 

 

First Published on: May 21, 2020 3:10 PM
Exit mobile version