भिकारी महिलेला मोबाईलचे क्रेझ; झोपडीत सापडले महागडे मोबाईल

भिकारी महिलेला मोबाईलचे क्रेझ; झोपडीत सापडले महागडे मोबाईल

बऱ्याचदा भीक मागून गुजराण करणाऱ्या भिकाऱ्यांच्या झोपडीत पैसे आढळल्याचे तुम्ही ऐकले आहे. मात्र, एका भिकारी महिलेच्या झोपडीत चक्क महागडे मोबाईल आढळून आल्याचे समोर आले आहे. वसई-विरार येथे ही घटना घडली असून विनोदबाई आजागृ सोलंकी, असे या भिकारी महिलेचे नाव आहे. या ४० वर्षांच्या भिकारी महिलेकडे इतके मोबाईल आढळल्याने चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी भिकारी महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून विरार पोलिसांनी तिला अटक केली आहे.

असे आले उघडकीस?

विरार पूर्व आर जे नाका परिसरात अनेक भिकारी, गरीब लोक पडीक जागेत झोपड्या करुन राहत आहेत. दरम्यान, विनोदबाई सोलंकी (४०) ही महिला गर्दी, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठ, सिग्नल परिसरात भीक मागायची. तसेच भीक मागण्याच्या बहाण्याने ही भिकारी महिला मोबाईल देखील चोरायची, अशी गुप्त माहिती विरार पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या झोपडीवर धाड टाकत तिच्या संपूर्ण झोपडीची तपासणी केली. या दरम्यान पोलिसांना एक दोन नाही तर तब्बल १० महागडे फोन सापडले. महिला भिकारीच्या झोपडीत मोबाईल पाहून पोलीस देखील अवाक झाले. याप्रकरणी आरोपी भिकारी महिलेला वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या महिलेला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा – मजुरी दिली नाही म्हणून कंत्राटदाराच्या डोक्यात घातला लोखंडी पाना!


First Published on: October 24, 2020 7:49 PM
Exit mobile version