गिफ्टच्या नावाखाली महिलेची तब्बल नऊ लाखांची फसवणूक!

गिफ्टच्या नावाखाली महिलेची तब्बल नऊ लाखांची फसवणूक!

गिफ्टच्या नावाने एका महिलेची नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार कांदिवलीत उघडकीस आला आहे. चारकोप पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फसवणूक झालेली ४३ वर्षीय महिला कांदिवली परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिचा पती मालदिव येथे नोकरी करत असून सध्या तिथेच वास्तव्यास आहे. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट असून या अकाऊंटच्या माध्यमातून ती नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर तिची दीपक जाफेट नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली. दीपकने डॉक्टर असून सध्या लंडनमध्ये राहत असल्याचे या महिलेला सांगितले. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.

दीपकने फेब्रुवारीत मी भारतात येणार असून मला माझ्या रुग्णालायासाठी काही औषधे घेऊन जायचे आहे, असे त्या महिलेला सांगितले. तसेच ती महिला फार्मासिस्टमध्ये कामाला असल्याने तिने मदत करावी अशी विनंती दीपकने केली होती. तसेच त्याने तिला लंडनमधून एक गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. १८ डिसेंबरला तिला दिल्लीच्या एका कस्टम्सच्या अधिकार्‍याचा फोन आला आणि तिचे एक पार्सल आले असून त्यासाठी तिला २७ हजार ५०० रुपये जमा करावे लागतील असे सांगितले.

तिने दीपकला फोन करुन ही माहिती दिली. त्यानेही ही रक्कम भरुन गिफ्ट घेण्यास सांगितले. त्यानंतर तिने ती रक्कम संबंधित कस्टम्स अधिकार्‍याने दिलेल्या बँक खात्यात जमा केली. तिला पुन्हा दुसर्‍या व्यक्तीने फोन करुन या पार्समध्ये विदेशी चलन आहेत आणि ही रक्कम देण्यासाठी तिला काही कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्या लागतील असे सांगून तिच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. विविध कारणे सांगून या भामट्यांनी तिच्याकडून सुमारे नऊ लाख रुपये घेतले.

दीपकने तिला विदेशी चलनातून तिचे पैसे काढून उर्वरित पैसे तिच्याकडे ठेवण्यास सांगितले. मात्र, ही रक्कम भरल्यानंतर तिला गिफ्ट मिळाले नव्हते. हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच तिने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणूकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या भामट्यांचा आता पोलीस शोध घेत असून त्याचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – विना पासपोर्ट वास्तव्य करणाऱ्या १४ नायजेरियन नागरिकांना अटक


 

First Published on: January 22, 2021 6:56 PM
Exit mobile version