मोहन रावले…आपला माणूस!

मोहन रावले…आपला माणूस!

मोहन रावले...आपला माणूस!

मोहन रावले गेले, यावर विश्वास बसत नाही. खासदार असताना त्यांचा पत्रकारांशी अतिशय जवळचा संबंध होता. ते स्वतः दैनिकांच्या कार्यालयात येऊन पत्रकारांशी गप्पा मारत. चहा घेत मुंबई ते दिल्ली असा प्रवास त्यांच्या तोंडून ऐकताना खूप माहिती मिळत असे… मुख्य म्हणजे अतिशय साधी राहणी आणि सामान्य माणसांसाठी सतत काही तरी करण्याची वृत्ती यामुळे ते कधी आपला विचार करत असतील असे कधी वाटले नाही. हे सारे त्यांना परळ लालबागच्या मातीतून मिळाले होते. निम्म माध्यमवर्गीय घरातून आलेल्या रावले यांना त्यांची दुःख माहिती होती. दररोजच्या जगण्यासाठी सामान्य माणसांना किती झगडावे लागते, हे ते जाणून होते. म्हणूनच युवा काळात ते याच सामान्य माणसांचा आधार झाले… अरे, आवाज कुणाचा शिवसेनेचा, मराठी माणसांचा… या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आवाजातून स्फूर्ती घेत मैदानात उतरलेल्या रावले यांची शेवटपर्यंत आपली नाळ या मैदानाशी घट्ट होती.

मातीचा माणूस कधी गडबडला नाही

प्रत्येक माणसांच्या आयुष्यात चढ उतार असतात ते त्यांच्या जीवनातही आले… पण, हा मातीचा माणूस कधी गडबडला नाही. नरसिंह राव यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांनी मातोश्रीच्या आदेशाविरोधात मतदान केले, हा आरोप घेऊन ते आयुष्यभर जगले. ही एका अश्वत्थाम्याची भळभळती जखम होती…पण, त्याची पर्वा करणारा हा माणूस नव्हता. मी माटुंग्याच्या खालसा कॉलेजचा विद्यार्थी. त्याच कॉलेजला रावले सुद्धा होते. भारतीय विद्यार्थी सेनेचा झेंडा घेऊन उतरलेल्या रावले यांचा कॉलेजमध्ये नव्हे तर मुंबई विद्यापीठात दबदबा होता. त्यावेळी त्यांच्या सोबत युवकांचा मोठा वर्ग होता. १९८१- ८२ चा सुमार होता. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रावले आणि त्यांचे सहकारी यांनी खालसावर उपोषण केले होते. सरळ मार्गाने प्राचार्य आपल्या मागण्या पूर्ण करत नाही हे लक्षात येताच त्यांनी शिवसेना हिसका दाखवत प्राचार्यांची पळता भुई केली.

रेल्वेत नोकरी मिळवून देण्यासाठी केले जीवाचे रान

लालबाग परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्याच परिसरातून पुढे आलेल्या युवा रावले यांच्यावर बाळासाहेब यांचे लक्ष होते. पुढे त्यांना एक एक संधी मिळत गेली. दक्षिण मुंबईसारख्या एका मतदार संघातून सातत्याने सहा वेळा खासदार म्हणून निवडून येणे नक्की सोपे नव्हते. पण, ही किमया रावले यांनी केली. कोणी म्हणेल की त्यात काय हा तर शिवसेनेचा आपला हक्काचा मतदार संघ होता… पण सतत जिंकून येण्यासाठी फक्त हीच एक गोष्ट पुरेशी ठरत नसते. मुळात त्या माणसात माणसे बांधून ठेवण्याची ती ताकद लागते. मराठी आणि त्यात मोठ्या संख्येने असलेल्या कोकणातील माणसांना जोडून ठेवण्याचे मोठे काम रावले यांनी केले. यासाठी ते सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळे, संस्थांचा आधार झाले. गिरणगावात कबड्डी आणि खोखोची मंडळे बहरात असताना रावले यांचा त्यांच्याशी, खेळाडूंशी जवळचे नाते होते. मुख्य म्हणजे त्यांना देशी खेळाडूंच्या व्यथा माहीत होत्या. यामुळे खासदार झाल्यानंतर खोखो खेळाडूंना रेल्वेत नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. आज रेल्वेत इतर खेळांबरोबर खोखो खेळाडूंची भरती होते, याचे सारे श्रेय रावले यांना जाते. आज महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून शेकडो खोखोपटूंना रेल्वेत कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या यासाठी रावले यांचे प्रयत्न कधीच विसरता येणार नाहीत. ही बातमी सांगण्यासाठी ते महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसला पेढे घेऊन आले होते. मटातला क्रीडा विभाग खोखोपटूंना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी रावले करत असलेल्या प्रयत्नांना मदत करत असल्याची त्यांना विशेष जाण होती.

मी नेता नाही, शिवसैनिक आहे’

राजकीय विचार करता रावले यांना किती यश मिळाले, यावर मत मतांतरे होतील. त्यांच्या बरोबरीचे नेते शिवसेनेच्या पहिल्या फळीत असताना ते कायम दुसऱ्या स्थानावर राहिले. विद्यार्थी जगतातील त्यांचा जोश पाहता ते खूप मोठी झेप घेतील, असे वाटत होते. पण, तसे झाले नाही. खासदार या पलीकडे ते खूप मोठे होऊ शकले नाही. या त्यांच्या मर्यादा ठरल्या की शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाच्या बाहेर राहून आपण भले की आपली खासदारकी ही त्यांनी स्वतः साठी सीमारेषा आखली होती, याचे नीट उत्तर शेवटपर्यंत मिळाले नाही. त्यांना यावर बऱ्याचदा छेडण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण, ते त्यांच्या नेहमीच्या शैलीत हसत राहत फार काही बोलत नसत. “मी नेता नाही, शिवसैनिक आहे. मला खूप मिळाले. बाळासाहेब होते म्हणून एका सामान्य घरच्या मुलाला दिल्लीपर्यंत जाता आले आणि काय पाहिजे”, असे सांगत ते पुढे काही बोलत नसत.

मला वाटते शेवटी शेवटी त्यांनी मनाने सक्रीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली होती. पत्रकारांशी सुद्धा त्यांचा नेहमीचा संपर्क कमी झाला होता. आज तर ते या जगातच नाही, ही बातमी आपल्या जवळच्या माणसापासून दूर नेणारी आहे. पण ज्यांनी कोणी रावले यांना त्यांच्या युवा काळात आणि सुरुवातीला खासदार म्हणून काम करताना पाहिले असेल त्यांना या माणसाची ताकद माहिती असेल. ऐंशीच्या दशकात बाळासाहेब शिवसेनेला आकार देत असताना त्यांना मोहनरुपी हिरा मिळाला आणि या हिऱ्याने आपल्या मातीतील जडघडणीनुसार त्याची चमक दाखवली. या हिऱ्याची प्रभा खूप दूरवर जाऊ शकली नाही, पण त्याची स्वतःची अशी चमक होतीच आणि ती विसरता येत नाही… मोहन रावले यांना “आपलं महानगर”ची भावपूर्ण श्रद्धांजली.


हेही वाचा – ‘परळ ब्रँड’चा शिवसैनिक हरपला, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन


First Published on: December 19, 2020 11:28 AM
Exit mobile version