मध्य रेल्वेचे मेगा ब्लॉक बेस्टच्या पथ्यावर; दोन दिवसांत तीन लाखांची कमाई

मध्य रेल्वेचे मेगा ब्लॉक बेस्टच्या पथ्यावर; दोन दिवसांत तीन लाखांची कमाई

मुंबई : सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानच्या ब्रिटिशकालीन धोकादायक कर्नाक पुलाच्या तोडकामासाठी मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवार असा 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला होता. या कालावधीत रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बसगाड्यांची विशेष व्यवस्था केली होती. या काळात बेस्ट बसमधून 49 हजार प्रवाशांनी प्रवास केला व त्यातून बेस्टला 3 लाख 17 हजार रुपयांची कमाई झाली.

सीएसएमटी ते मस्जिद बंदर रेल्वेस्थानकादरम्यान 1868मध्ये बनवण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचे पाडकाम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले. कर्नाक पूलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेकडून शनिवार, 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते रविवारी, 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 असा 27 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवांसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याची घोषण मध्य रेल्वेने आधीच केली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक फक्त भायखळा रेल्वे स्थानकापर्यँत तर हार्बरची वाहतूक फक्त वडाळापर्यंत सुरू होती.

हेही वाचा – आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा, नितीन गडकरींनी व्हिडीओ केला शेअर

या मेगा ब्लॉकमुळे भायखळा व वडाळा येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या व तेथून भायखळा आणि वडाळा रेल्वे स्थानकापर्यंतप्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होणार होती. मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन आणि बेस्ट उपक्रम यांनी समन्वयातून रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट परिवहन विभागाच्या 85पेक्षाही जास्त बसगाड्यांची व्यवस्था केली. या बसगाड्यांचा वापर करून (471 बसफेऱ्या) तब्बल 48 हजार 909 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे बेस्टला 3 लाख 17 हजार रुपयांची कमाई झाली. यासंदर्भातील माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा – अशा माणसाला राज्यपाल पदावर ठेवू नये; भगतसिंग कोश्यारींविरोधात शिंदे गट आक्रमक

मध्य रेल्वेने अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने 27 तासांचा मेगाब्लॉक घेतलेला असतानाही 17 तासांतच मेन लाइनची लोकलसेवा सुरु केली होती. लोकलसेवा बंद असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून बेस्ट प्रशासनाने या काळात विशेष बसगाड्या सोडल्या होत्या.

हेही वाचा – भाजपाची मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करताहेत, शिवसेनेचा हल्लाबोल

First Published on: November 21, 2022 11:08 PM
Exit mobile version