घर महाराष्ट्र आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा, नितीन गडकरींनी व्हिडीओ केला शेअर

आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा, नितीन गडकरींनी व्हिडीओ केला शेअर

Subscribe

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जास्त आक्रमक झाली असून भाजपाकडून काल सारवासारव करण्याचा प्रयत्न झाली. पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती, असे भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यांच्याप्रमाणेच राज्यपाल कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आहेत. तुमचे हीरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत, असे राज्यपालांनी केले. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपालांनी हे वक्तव्य केले.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्यावर यावरून चौफेर टीका होत असतानाच नितीन गडकरींनी एक ट्वीट करत त्यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी शिवरायांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. आमच्या आई-वडिलांपेक्षा देखील छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचे जीवन आमचे आदर्श आहे. यशवंत कीर्तिवंत, वरदवंत सामर्थ्यवंत, जाणता राजा! निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी । वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता, असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. नितीन गडकरी यांचे ट्वीट म्हणजे भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांना एक चपराक आहे, असे मानले जाते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -