Corona Live Update: बंगालमध्ये तैनात केलेल्या ४९ एनडीआरएफच्या जवानांना कोरोनाची लागण!

Corona Live Update: बंगालमध्ये तैनात केलेल्या ४९ एनडीआरएफच्या जवानांना कोरोनाची लागण!

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

बंगालमध्ये तैनात करण्यात आलेल्या ४९ एनडीआरएफच्या जवानांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बंगालमध्ये आलेल्या अम्फान चक्रीवादळानंतर १७८ एनडीआरएफ जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

भिवंडीत सोमवारी एकाच दिवसात कोरोनाचे २४ नवे रुग्ण आढळले असून यारुग्णांपैकी चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात ११ नवे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी ग्रामीण आणि शहरात एकूण ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच आज शहरातील ३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

भिवंडी शहरातील आतापर्यंत २८४ रुग्ण आढळले असून १३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर शहरातील २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून १३० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत १७२ रुग्ण आढळले असून त्यापैकी ६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून १०७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान सोमवारी आढळलेल्या ३५ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर आणि ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ४५६ वर पोहचला असून त्यापैकी १९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २३७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

 


अंबरनाथमध्ये सोमवारी  कोरोनाचे ३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अंबरनाथमध्ये एकूण कोरोनाचे ३९२ रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. १३३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबई आज कोरोनाचे १ हजार ३१४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ४९ हजार ८६३वर पोहोचला असून मृतांचा आकडा १ हजार ७०० झाला आहे. तसेच आज मुंबईत ८४२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजपर्यंत २२ हजार ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


आज राज्यात कोरोनामुळे १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ५५३ नवीन रुग्णांची आज नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळीचा आकडा ३ हजार १६९वर पोहोचला असून एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ झाला आहे. तर आज राज्यात १ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण ४० हजार ९७५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


आज धारावीत कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील नवीन रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आतापर्यंत धारावीत एकूण १ हजार ९२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच दादरमध्ये १२ नवे रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा ४२०वर पोहोचला आहे. तर माहिममध्ये आज १४ नवे रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा ६५१ झाला आहे.


‘कोविड कोरोना १९’ बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी ‘जंबो फॅसिलिटी’ अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत आता प्रस्तावित ‘मुंबई मेट्रो’च्या पुढाकाराने दहिसर पूर्व येथे ९५५ खाटांचे; तर दहिसर पश्चिमेकडे कांधरपाड्याजवळ ११० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. तर मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत १ हजार ९१५ खाटांचे उपचार केंद्र ‘सिडको’च्या पुढाकाराने उभारण्यात येत आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्राची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. या तीनही ठिकाणांची पाहणी केल्यानंतर मंत्रीमहोदयांनी या ठिकाणी दिवस-रात्र पद्धतीने अव्याहतपणे सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. ही तिन्ही उपचार केंद्रे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होतील.


देशापेक्षाही जळगावचा मृत्यूदर ४ पट जास्त

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोरोना विषाणूने अक्षरश: देशात कहर केला आहे. तर कोरोनामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि पुणे या शहरात सर्वात अधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे, त्यामुळे ही शहरे सध्या चर्चेत आहेत. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव या जिल्ह्याने मुंबई, पुणे आणि देशाला देखील मृत्यूदरात मागे टाकले आहे. कोरोनानुळे देशात होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर चारपट अधिक आहे. मागील ३० दिवसांच्या कालावधीत तब्बल ११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


केजरीवाल यांच्यात आढळली कोरोनाची लक्षणे, कोरोना चाचणी होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली आहे. ताप तसंच घसा दुखत असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. स्वत:ला त्यांनी आयसोलेट केलं असून त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. रविवारी दुपारपासून सर्व बैठका रद्द केल्या. शिवाय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोणालाही भेटलेले नाहीत. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. (सविस्तर वाचा)


सनदी अधिकाऱ्यांच्या ‘यशोधन’ इमारतीत खळबळ

राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू केलेलं असतानाच गेल्या दिवसभरात १० हजार रुग्ण सापडल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य सुविधा यांच्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढू लागल्याचं स्पष्ट झालं आहे. नव्या रुग्णांमध्ये जसे पोलीस कर्मचारी आहेत, तसेच आरोग्य यंत्रणेतले कोरोना योद्धा देखील आहेत. त्याशिवाय, बीएसटी कर्मचारी, सामान्य नागरिक असे मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असताना आता राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते, त्यांच्यामध्ये देखील कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईत चर्चगेट परिसरात असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या यशोधन या इमारतीमध्ये तब्बल २८ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मुंबईच्या प्रशासकीय वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच मुंबई महानगर पालिकेमध्ये कोरोनाविरोधी टीमची जबाबदारी असलेल्या एक महिला अधिकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. आत्तापर्यंत प्रधान सचिव दर्जाचे ४ अधिकारी आणि ८ आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासकीय वर्गामध्ये देखील आता चिंतेचं वातावरण पसरू लागलं आहे. (सविस्तर वाचा)


लसीशिवाय कोरोनाला हरवणं शक्य

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून आख्ख जग कोरोनाच्या दहशतीखाली आहे. जगातल्या जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. ते शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येत आहेत. त्यामुळे आख्खं जग कोरोनाच्या प्रचंड दाढेखाली अडकलेलं असताना या सगळ्यामध्ये एक आशेचा किरण आता समोर आला आहे. न्यूझीलंड या देशानं कोरोनाला पूर्णपणे हरवून पहिला कोरोनामुक्त देश होण्याचा मान मिळवला आहे. या देशात सद्यघडीला एकही कोरोनाचा रुग्ण शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे लवकरच न्यूझीलंडमधली सर्व बंधनं हटवण्यात येणार आहेत. जगातल्या इतर देशांमध्ये अजूनही कोरोना ठाण मांडून बसलेला असतानाही आख्ख्या जगासाठी ही दिलासादायक बाब आहे. कारण कोरोनाच्या लसीशिवाय देखील कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे न्यूझीलंडनं दाखवून दिलं आहे. (सविस्तर वाचा)


चीनने कोरोना व्हायरस संदर्भात दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

जगभरात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर चीनच्या वुहान शहरातून पसरणाऱ्या कोरोनाने सर्वच देशात दहशत निर्माण केली आहे. या विषाणूमुळे अमेरिकेसह अनेक बलाढ्य देशांना याचा फटका बसला आहे. अमेरिकेत १ लाखाहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे अमेरिका सातत्याने कोरोनावरुन चीनवर आरोप करत आहे. या दरम्यान. चीनने एक श्वेत पत्र जारी केले असून कोरोना विषाणूच्या प्रसाराची माहिती उशिरा देण्याच्या आरोपाने घेरलेल्या चीनने पुन्हा एकदा स्वत:ला निर्दोष ठरवले आहे. (सविस्तर वाचा)


करोनामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि पुणे ही दोन शहरं सध्या चर्चेत आहे. राज्यात सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या मुंबईत आहे. त्यापाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, एक धक्कादायक देणारी माहिती समोर येत आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे. करोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर चारपट अधिक आहे. मागील ३० दिवसांच्या कालावधीत तब्बल ११२ जणांचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्रातही परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नवे धोरण आखण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठीच्या चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.


महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकरता दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तर एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर पोलीस प्रशासन दलातील २ हजार ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.


औरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये ४५ नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ६५ झाली आहे. तर यापैकी १ हजार २२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता ७३७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (सविस्तर वाचा)


पुण्यात २४ तासांत आढळले १५९ नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गेल्या २४ तासांत दिवसभरात नव्याने १५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८८१ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, पिंपरी – चिंचवड शहरात नव्याने ६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोन महिलांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ५६ हजार ६११ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख २५ हजार ३८१ अॅक्टिव्ह केसेस असून १ लाख २४ हजार ०९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार १३५ जणांचा मृत्यू झालेला आहे.


राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना रविवारी अचानक तब्बल ३००७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८५ हजार ९७५ वर पोहोचली आली आहे. त्याचप्रमाणे ९१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३०६० झाली आहे. राज्यातील मृत्यू दर ३.५५ टक्क्यांवर आला आहे. रविवारी राज्यातील १९२४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत ३९ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४५.७२ टक्के एवढे आहे.

राज्यात रविवारी ९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यामध्ये मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा भाईंदर ४, पालघर १, नाशिक १, पुणे ६, सोलापूर ८, कोल्हापूर २, जालना १, अकोला मनपा १ असे मृत्यू झाले आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

First Published on: June 8, 2020 11:33 PM
Exit mobile version