सनदी अधिकाऱ्यांच्या ‘यशोधन’ इमारतीत खळबळ; २८ कोरोना पॉझिटिव्ह!

Yashodhan Building
मुंबईतील सनदी अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेली यशोधन इमारत (फोटो - दीपक साळवी)

राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू केलेलं असतानाच गेल्या दिवसभरात १० हजार रुग्ण सापडल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य सुविधा यांच्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढू लागल्याचं स्पष्ट झालं आहे. नव्या रुग्णांमध्ये जसे पोलीस कर्मचारी आहेत, तसेच आरोग्य यंत्रणेतले कोरोना योद्धा देखील आहेत. त्याशिवाय, बीएसटी कर्मचारी, सामान्य नागरिक असे मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असताना आता राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते, त्यांच्यामध्ये देखील कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईत चर्चगेट परिसरात असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या यशोधन या इमारतीमध्ये तब्बल २८ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मुंबईच्या प्रशासकीय वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच मुंबई महानगर पालिकेमध्ये कोरोनाविरोधी टीमची जबाबदारी असलेल्या एक महिला अधिकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. आत्तापर्यंत प्रधान सचिव दर्जाचे ४ अधिकारी आणि ८ आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासकीय वर्गामध्ये देखील आता चिंतेचं वातावरण पसरू लागलं आहे.

९० पैकी २८ कोरोना पॉझिटिव्ह!

‘यशोधन’मध्ये मुंबईतल्या विविध विभागांमध्ये, मंत्रालयात आणि महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांमध्ये काम करत असलेले सनदी अधिकारी राहतात. नुकतीच याच इमारतीत राहणारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी यांच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे इथल्या सर्व अधिकाऱ्यांच्या चालक, कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात चाचणी केलेल्या एकूण ९० जणांपैकी २८ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ‘यशोधन’मध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या या लॉकडाऊन काळात देखील द्या सनदी अधिकाऱ्यांमार्फत काही प्रमाणात राज्यातले सरकारी व्यवहार सुरू आहेत, त्याच अधिकाऱ्यांच्या दाराशी कोरोना आता पोहोचला आहे. एकूण सापडलेल्या २८ कोरोनाबाधितांपैकी ८ जण हे त्या इमारतीत राहात होते, तर इतर २० जण बाहेरून येत होते. यामध्ये मुंबईतील कोविड १९ विरोधातील टास्क फोर्सची जबाबदारी असलेल्या आयएएस अधिकाऱ्यासोबत इतर अधिकाऱ्यांचे ३ चालक, सार्वजनिक बांधकाम विभागातले २ अधिकारी आणि इतर घरकामगार आहेत.

यशोधन अनेक बड्या अधिकाऱ्यांचं निवासस्थान

यशोधनमध्ये एकूण ४२ वरीष्ठ सनदी अधिकारी राहातात. यामध्ये गृह खात्याचे सचिव संजय कुमार, आरोग्य खात्याचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, मुख्यंमत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आणि त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या एव्हिएशन सेक्रेटरी वळसा नायर-सिंह, प्रधान सचिव भूषण गगराणी, महिला व बालकल्याण सचिव आय कुंदन, त्यांचे आयपीएस पती निकेत कौशिक, राज्याच्या गुप्तहेर खात्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नियंत्रण कक्षात उणेपुरे १५ कर्मचारी!

दरम्यान, याआधी देखील यशोधनमध्येच राहणाऱ्या ३ सनदी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय, मुंबई महानगर पालिकेमध्ये कोरोनाविरोधातील टीमची जबाबदारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. इतकंच नाही, तर कोरोनाशी लढा देण्यासाठी पालिकेने उभारलेल्या नियंत्रण कक्षामध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून तिथल्या एकूण ४२ कर्मचाऱ्यांपैकी २७ कर्मचारी कोरोनासदृश्य परिस्थितीत असल्यामुळे त्यातल्या काहींवर उपचार सुरू असून काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे या कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांना अवघ्या १५ लोकांसोबतच या कक्षाचं काम चालवावं लागत आहे.

आता पालिकेच्या नियमांनुसार इमारतीतील कोरोनाग्रस्त सापडलेले मजले सील करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये बहुतेकांमध्ये लक्षणं दिसत नसून त्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच, ज्या मजल्यांवर हे कोरोनाबाधित सापडले, तिथल्या अधिकाऱ्यांची ५ दिवसांनंतर कोरोना चाचणी घेतली जाईल. जर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर त्यांना अजून काही दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल, असं देखील काकाणी यांनी सांगितलं आहे.

आधी सामान्य नागरिक, डॉक्टर, नर्स, आरोग्य यंत्रणेतले कर्मचारी, पोलीस, बेस्टचे कर्मचारी, रेल्वे कर्मचारी अशा सेवांमधल्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. मात्र आता सनदी वर्गामध्ये देखील जर या विषाणूचा फैलाव झाला, तर राज्याचा गाडा हाकणार कोण? या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधताना सरकारच्या नाकी नऊ येऊ शकतात!