बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच; संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांना टोला

बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच; संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांना टोला

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 41 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. यात एकनाथ शिंदे गटाकडून आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे खरे शिवसैनिक असल्याचा दावा करण्यात येतोय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडूनही स्व:ला खरे शिवसैनिक संबोधले जात आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच नाव वापरण्यावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. या वादात आता छत्रपती संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू नका, तुमच्या बापाचे नाव वापरुन मत मागा, मग निवडून येता का बघा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले होते. मात्र बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकट्याचे नसून ते लोकनेते आहेत. त्यांचे नाव घेण्याचा अधिकार सर्वांना आहे अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टोला लगावला आहे. तसेच ज्यांना कुणाला सरकार स्थापन करायचं असेल, त्यांनी करा, मात्र शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवा, अस आवाहनही संभाजीराजेंनी केले आहे. बीडमधील गेवराई केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या उद्धाटनाप्रसंगी संभाजीराजे बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वी राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकीय वातावरण पेटले होते. या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपतींनी जोरदार प्रयत्न केले, यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला पाठींबा देण्याची विनंती केली, मात्र शिवसेनेने संभाजीराजे छ्त्रपतींना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेची ही ऑफर नाकारत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेने सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राज्यसभेतील शिवसेना नेते संजय पवार यांचा पराभव झाला. यावेळी राज्यसभेतील शिवसेनेच्या पराभवावरही संभाजीराजे छत्रपतींनी निशाणा साधला होता. मला उमेदवारी दिली असली शिवसेनेवर ही वेळ आली नसती अशा शब्दात संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यानंतर अद्यापही ते शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसतेय.

संभाजीराजे शेतकऱ्याच्या बांधावार

यात राज्यात सत्तास्थापनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोप- प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे, तर दुसरीकडे राज्यात पेरणीचे दिवस आहेत, पण अनेक ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस सुरु नसल्याने शेतकऱ्यांची पेरणी लांबली आहे, असं असताना संभाजीराजें शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणीचा आनंद घेतला. संभाजीराजे आज बीडच्या तलवाडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये चक्क सोयाबीनची पेरणी केली. सरकार कोणाचे ही असो शेतकऱ्यांना मात्र पेरणीआधी मुबलक कर्ज मिळाले पाहिजे. अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली. यावेळी पेरणीनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांसोबत चटणी आणि भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी चक्क संभाजीराजेंनी शेतात बसून चटणी भाकरी खाल्याने शेतकऱ्यांनाही आनंदाचा पारावार राहिला नाही.


सरकारविरोधात लवकरच अविश्वास प्रस्ताव, ‘हा’ पक्ष घेणार पुढाकार

First Published on: June 28, 2022 5:31 PM
Exit mobile version