फडणवीस यांची दिल्लीत नड्डा यांच्याशी खलबते, राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली फेऱ्या वाढल्या आहेत. आजही ते नवी दिल्लीमध्ये दाखल झाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी सुमारे तासभर चर्चा केली.

भाजपाच्या कोअर टीमची बैठक सोमवारी झाली. त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी थेट नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गेले सात दिवस आसामच्या गुवाहाटीतल रॅडिसन ब्लू या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंडाचा झेंडा फडकावला आहे. ते मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. मात्र आज ते ते दिल्लीला जाणार होते आणि तिथे त्यांची देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती, असा अंदाजही वर्तविण्यात आला होता. मात्र, केवळ फडणवीस आणि नड्डा यांचीच भेट झाली.

फडणवीस आणि शिंदे यांची याआधी चार दिवसांपूर्वी गुजरातमध्ये बडोद्यात गुप्त भेट झाली होती व त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.