“ठाकरेंच्या मागे नेमकी कोणती शिवसेना?” निलेश राणेंची व्हिडीओच्या माध्यमातून टीका

“ठाकरेंच्या मागे नेमकी कोणती शिवसेना?” निलेश राणेंची व्हिडीओच्या माध्यमातून टीका

राज्यात सध्या बारसु सोलगावमध्ये होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी विरूद्ध ठाकरे गट असा वाद पाहायला मिळत आहे. पण या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे हे ठाकरे गटावर टीका करताना दिसून येत आहे. ट्वीटच्या माध्यमातून निलेश राणे हे ठाकरे गटावर टीका करत आहेत. पण आता पुन्हा त्यांनी एक ट्वीट करत बारसु रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटावर टीका केली आहे. ठाकरेंच्या मागे नेमकी कोणती शिवसेना आहे, असा प्रश्न निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटरला पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून विचारत ठाकरे गटावपर टीका केली आहे.

“आज सकाळी बारसु गावामध्ये तिथे विनायक राऊत यांच्यासोबत काही लोक हे आंदोलकांच्या भेटीला गेले होते. मुळात विनायक राऊत आताच कसे गेले? कारण का आता तिथे कॅमेरे लागले आहेत. हेच जे काही 100-150 लोक आहेत, ते काही महिन्यांपासून या प्रकल्पाला विरोध करत आहेत. पण तेव्हा विनायक राऊत त्यांना भेटायला तिथे गेले नाही. पण आता तिथे कॅमेरे लागल्याने अचानकपणे आज विनायक राऊत हे तिथे गेले. आंदोलक ग्रामस्थांना भेटल्यानंतर विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की मी आख्खी शिवसेना तुमच्या मागे उभी करतो, पण मला आश्चर्य वाटले की, या माणसाच्या मागे शिवसेना आहे कुठे? कुठली शिवसेना हा उभी करणार? मुळात ह्याच्याच मागे याचा पक्ष नाही, यांच्या पक्षाला आता नाव नाही. त्याला चिन्ह नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नेहमीसारखा हवेत गोळीबार केला आहे,” असे म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

विनायक राऊतसारखे काडी लावण्याचे काम करतायत
बारसु प्रकल्पाबाबत प्रशासनाकडून समजावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण आग लावण्याचे आणि काड्या लावण्याचे काम हे विनायक राऊतसारखे लोक करत आहेत. काही उलटसुलट अफवा देखील पसरवण्यात येत आहेत. पण पालकमंत्री ग्रामस्थांना समजावण्याचे काम करत आहेत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देखील समजावण्याचे काम करण्यात येत आहेत. यामधूनच हा प्रकल्प उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्याला लवकरच योग्य दिशा मिळेल असेही निलेश राणे यांनी त्यांच्या या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राने ‘या’मध्ये पटकविला प्रथम क्रमांक; मुख्यमंत्री शिंदे यांनी केले कौतुक

First Published on: April 26, 2023 6:41 PM
Exit mobile version