नव्या मंत्र्यांसाठी पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता, नवी तारीख कोणती?

नव्या मंत्र्यांसाठी पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता, नवी तारीख कोणती?

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान नियोजित करण्यात आले होते. मात्र हे अधिवेशन आता पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे. उद्या, सकाळी ११ वाजता शपथविधी झाल्यानंतर नव्या मंत्रिमहोदयांना आपल्या खात्याची माहिती होण्याकरता, प्रलंबित प्रश्न आणि निधी यासाठी किमान आठवड्याभराचा अवधी द्यावा लागतो. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे. तसेच, कामकाज सल्लागार समितीची उद्या होणारी बैठकही रद्द करण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ते २४ ऑगस्टदरम्यान हे पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. (Rainy session postponed again)

हेही वाचा – शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या! 15 ते 18 मंत्री घेणार शपथ?

मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी ११ वाजता होईल. उद्या अनेक नवीन मंत्री शपथ घेतील. त्यानंतर तत्काळ पावसाळी अधिवेशन घेतल्याने मंत्र्यांना आपल्या खात्याविषयी माहिती मिळणे कठीण जाईल. मंत्र्यांना आपल्या खात्याविषयी सविस्तर माहिती घेण्याकरता वेळ मिळावा याकरता हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, १७, १८, २२, २३ ऑगस्ट रोजी अधिवेशन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! जनतेतून निवडून आलेल्यांनाच शिंदे कॅबिनेटमध्ये संधी?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, हेच उत्तर प्रत्येकवेळी देत होते. तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याचा शपथविधी न झाल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार करायाला कशाला घाबरता, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ‘दोघांचे जम्बो मंत्रिमंडळ’ असे म्हणून तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘दोन लोकांचे अपंग मंत्रिमंडळ’ असे म्हणून हिणवले आहे.

फॉर्म्युला ठरला?
मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गटाला 35 टक्के तर, भाजपाला 65 टक्के मंत्रीपदे मिळतील. जम्बो मंत्रिमंडळ पद्धतीला आळा घालण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार 42 मंत्रिपदांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. ते ध्यानी घेता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता उर्वरित 40 पदांपैकी शिंदे गटाला 15 तर, भाजपाच्या वाट्याला 25 मंत्रीपदे येतील. यात राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे आता मंत्रीपदाची लॉटरी कोणाकोणाला लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: August 8, 2022 6:26 PM
Exit mobile version